Home Cities यावल यावल तालुक्यात समग्र शिक्षा अभियान सामाजिक अंकेक्षणाची जनसुनावणी प्रक्रिया संपन्न 

यावल तालुक्यात समग्र शिक्षा अभियान सामाजिक अंकेक्षणाची जनसुनावणी प्रक्रिया संपन्न 

0
12


यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । यावल तालुक्यात शिक्षण विभागाच्या वतीने समग्र शिक्षा अभियान अंतर्गत सामाजिक अंकेक्षण प्रक्रियेची जनसुनावणी नुकतीच पार पडली. या जनसुनावणीच्या माध्यमातून तालुक्यातील शाळांमध्ये झालेल्या सामाजिक अंकेक्षणातील उणिवा, त्रुटी आणि त्यावरील करण्यात आलेल्या कार्यवाहीचा आढावा घेण्यात आला. यावेळी यावल तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी फिरोज पठाण, शिक्षण विस्तार अधिकारी सरोज पाटील, सामाजिक अंकेक्षण सोसायटीचे जिल्हा साधन व्यक्ती विलास भाऊराव गजबे, तालुक्यातील सर्व शाळांचे मुख्याध्यापक तसेच केंद्रप्रमुख उपस्थित होते.

एप्रिल २०२६ मध्ये यावल तालुक्यातील १४० प्राथमिक शाळांचे महाराष्ट्र राज्य सामाजिक अंकेक्षण व पारदर्शकता सोसायटी, मुंबई यांच्या माध्यमातून सामाजिक अंकेक्षण पूर्ण करण्यात आले होते. या प्रक्रियेत शाळांमधील शैक्षणिक सुविधा, व्यवस्थापन, विविध योजनांची अंमलबजावणी यासंदर्भातील उणिवा व त्रुटींची नोंद घेण्यात आली होती. त्यानंतर या त्रुटींवर चर्चा करण्यासाठी जनसुनावणी आयोजित करण्यात आली. जनसुनावणीदरम्यान यावल तालुक्यातील सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांनी आपल्या शाळांमध्ये आढळून आलेल्या उणिवा व त्रुटींची पूर्तता केल्याची माहिती जनसुनावणी पॅनलसमोर सादर केली. शाळांमध्ये पारदर्शकता आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण व्यवस्था निर्माण करण्यासाठी सामाजिक अंकेक्षण प्रक्रिया महत्त्वाची असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

जनसुनावणी पॅनलमध्ये सामाजिक अंकेक्षण सोसायटीचे जिल्हा साधन व्यक्ती विलास भाऊराव गजबे, शिक्षण विस्तार अधिकारी सरोज संजय पाटील, बचत गट प्रतिनिधी सरला संजय चौधरी, शिक्षण क्षेत्रात कार्यरत स्वयंसेवी संस्थेचे प्रतिनिधी डॉ. प्रमोद सोनार तसेच शैक्षणिक तज्ज्ञ प्रतिनिधी संजय श्रीकृष्ण चौधरी यांचा समावेश होता. या पॅनलने शाळांकडून सादर करण्यात आलेल्या माहितीची पाहणी करून जनसुनावणीची प्रक्रिया पूर्ण केली. यावेळी किनगाव येथील मुख्याध्यापक संजीव शेटे आणि शरीफ तडवी यांनी शाळांशी संबंधित माहिती सादर केली. यावल पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी फिरोज पठाण आणि शिक्षण विस्तार अधिकारी सरोज पाटील यांनी उपस्थित मुख्याध्यापकांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगेश इंगळे यांनी केले, तर श्रीकांत मोटे यांनी उपस्थितांचे आभार मानले. सामाजिक अंकेक्षणाच्या माध्यमातून शाळांच्या कामकाजात पारदर्शकता वाढवून विद्यार्थ्यांना अधिक चांगल्या शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न शिक्षण विभागाकडून करण्यात येत आहे.


Protected Content

Play sound