Home Cities यावल बामणोद पी. एस. एम. एस. स्कूल व ज्युनिअर कॉलेजचा वर्धापन दिन उत्साहात  

बामणोद पी. एस. एम. एस. स्कूल व ज्युनिअर कॉलेजचा वर्धापन दिन उत्साहात  

0
13


यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील बामणोद येथील प्राकृतिक शिक्षण मंडळाच्या पी. एस. एम. एस. स्कूल व ज्युनिअर कॉलेजचा ८० वा वर्धापन दिन सोहळा मोठ्या उत्साहात आणि आनंदमय वातावरणात साजरा करण्यात आला. या निमित्ताने विद्यार्थ्यांच्या विविध कलागुणांना वाव देणारे कार्यक्रम, स्पर्धा तसेच प्रेरणादायी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राकृतिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र कोल्हे होते. त्यांनी सरस्वती पूजन, इमारत पूजन तसेच केक कापून वर्धापन दिन सोहळ्याची सुरुवात केली. यावेळी विद्यार्थ्यांना भविष्यातील वाटचाल कशी असावी याबाबत मार्गदर्शन करताना त्यांनी शिस्त, शिक्षण आणि सामाजिक बांधिलकी यांचे महत्त्व अधोरेखित केले. शाळेचे मुख्याध्यापक व प्राचार्य बी. एस. हजबंन यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक सादर केले. विद्यार्थ्यांनी शाळेविषयी आपले मनोगत व्यक्त करून शाळेतील आठवणी आणि अनुभवांना उजाळा दिला. माजी विद्यार्थिनी स्वीटी तायडे यांनीही आपल्या शालेय जीवनातील अनुभव शेअर करत संस्थेविषयी कृतज्ञता व्यक्त केली. पर्यवेक्षक जी. एच. जावळे आणि ज्येष्ठ शिक्षिका रजनी झांबरे यांनी शाळेचा इतिहास उलगडून सांगत संस्थेच्या ८० वर्षांच्या वाटचालीचा आढावा सादर केला. यावेळी शालेय गीत, निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा आणि वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन करून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यात आले. कार्यक्रमात संस्थेचे चेअरमन डॉ. जे. डी. भंगाळे, व्हाइस चेअरमन श्री देविदास तळेले, प्रागतिक प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक तसेच सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विद्यार्थ्यांना मुख्याध्यापकांच्या हस्ते चॉकलेट वाटप करण्यात आले तसेच स्पर्धांतील विजेत्या विद्यार्थ्यांना पेन बक्षीस देऊन गौरविण्यात आले. यावेळी “एक विद्यार्थी एक रोप लावावे” असे आवाहन मुख्याध्यापकांनी करत पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला. शाळेचा विद्यार्थी सोहम कोल्हे याची राष्ट्रीय पातळीवरील तायक्वांदो स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल विशेष सत्कार करण्यात आला. तसेच जो विद्यार्थी झाड लावून ते जगवेल त्याला ₹501 रोख बक्षीस देण्याची घोषणा मुख्याध्यापकांनी केली, ज्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाबाबत सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बी. एम. लहासे यांनी केले तर आभार प्रदर्शन सौ. चेतना चौधरी यांनी मानले. संपूर्ण सोहळा उत्साह, प्रेरणा आणि शैक्षणिक संस्कारांनी परिपूर्ण वातावरणात पार पडला.


Protected Content

Play sound