जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । स्तन कर्करोग संदर्भात जनजागृती महत्वाची आहे. लक्षणे दिसू लागताच रुग्णालयात येऊन तपासणी केली पाहिजे. त्याकरिता लवकर निदान, लवकर उपचार या सूत्रानुसार वेळीच कर्करोग निर्मूलन होऊ शकते अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील तज्ज्ञ महिला डॉक्टरांनी दिली. रुग्णालयातील ७५ डॉक्टर्स, परिचारिका, विद्यार्थी यांची स्तन कर्करोगबाबत तपासणी करण्यात आली. यात ६ जणांना स्तनांचे विविध आजार व ३ जणांना कर्करोगसदृश आजार आढळल्याने या ९ महिलांवर उपचार करण्यात येणार आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात शल्यचिकित्सा विभागातर्फे स्तन कर्करोग तपासणी अभियान अंतर्गत बुधवारी कार्यशाळा घेण्यात आली. रुग्णालयातीलच अधिकारी, कर्मचाऱ्यांची तपासणी करण्यात आली. कार्यक्रमाचे उदघाटन अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर यांनी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून झाले. प्रसंगी मंचावर प्रमुख पाहुणे म्हणून शल्यचिकित्सा विभागाचे प्रमुख तथा उप अधिष्ठाता डॉ. मारोती पोटे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजय गायकवाड, डॉ. अरुण कसोटे, डॉ. योगिता बावस्कर, अधिसेविका प्रणिता गायकवाड, उपक्रमाच्या नोडल अधिकारी डॉ. संगीता गावित उपस्थित होते.
प्रस्तावनेतून डॉ. गावित यांनी कार्यक्रमाचा उद्देश सांगितला. तर डॉ. मारोती पोटे यांनी अभियानाचे महत्व सांगून मनोगत व्यक्त केले. अधिष्ठाता डॉ. ठाकूर यांनी, आपल्या शरीराची वेळोवेळी तपासणी केली पाहिजे. जेणेकरून आपल्याला आजार उदभवले असतील तर त्याची वेळेवर माहिती मिळून वेळीच उपचार करता येईल, असे सांगितले. सूत्रसंचालन डॉ. स्नेहा वाडे यांनी तर आभार डॉ. साक्षी राणे यांनी मानले.
कार्यक्रमात ७५ महिलांची स्तन कर्करोग संदर्भात तपासणी करण्यात आली. यात ९ जणांना लक्षणे दिसून आली. त्यांचेवर उपचार करण्यात येणार आहेत. कार्यक्रमासाठी डॉ. ईश्वरी गारसे, डॉ. किरण सोंडगे, डॉ. अश्वराज, डॉ. कुमार शार्प, डॉ. स्वराज हरणे, डॉ. प्रज्वल बोर्डे, डॉ. नोमान खान, डॉ. आसमंत लांडगे, डॉ. कृष्णा वणवे, जनसंपर्क सहायक विश्वजीत चौधरी, राकेश सोनार, प्रकाश पाटील, भरत पाटील आदींनी परिश्रम घेतले.
उपस्थितांना मार्गदर्शन
उदघाटनानंतर डॉक्टर्स, परिचारिका, विद्यार्थी यांना स्तन कर्करोग विषयी सविस्तर माहिती डॉ. संगीता गावित, डॉ. प्रज्ञा सोनवणे, डॉ. साक्षी राणे, डॉ. स्नेहा वाडे यांनी दिली. वयाच्या विशीनंतर प्रत्येक स्त्रियांनी आपल्या स्तनाची नियमित तपासणी केली पाहिजे. आपल्या शासकीय रुग्णालयात कक्ष ११६ येथे बुधवारी सकाळी तपासणी करून मार्गदर्शन मिळते. तुमच्या स्तनांचे स्वरूप परिचित होण्यास व कोणत्याही बदलांबद्दल अधिक सतर्क राहण्यास मदत करेल.दर तीन वर्षांनी, डॉक्टरांकडून स्तनाची तपासणी करून घ्या. क्लिनिकल स्तन तपासणीद्वारे गाठी शोधल्या जाऊ शकतात. जे लोक लठ्ठपणाने ग्रस्त आहेत त्यांना स्तनाचा कर्करोग होण्याची शक्यता जास्त असते. अशा परिस्थितीत वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी योग्य आहार आणि नियमित व्यायाम गरजेचं आहे, अशा टिप्स तज्ज्ञ डॉक्टरांनी दिल्या.