‘बेटी बचाव, बेटी पढाव’ची जनजागृती; महिला पोलिसांची रॅली

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । ‘बेटी बचाव बेटी पढाव’ या महत्त्वाकांक्षी उपक्रमाला दहा वर्षे पूर्ण झाले. या निमित्ताने जळगाव जिल्हा पोलीस दलातील ७५ महिला अधिकारी आणि पोलीस कर्मचाऱ्यांनी मोठ्या उत्साहात मोटरसायकल रॅली काढून जनजागृती केली. या उपक्रमाच्या माध्यमातून महिलांचे सशक्तीकरण आणि शिक्षणाच्या महत्त्वावर भर देण्यात आला.

रॅलीला अप्पर पोलीस अधीक्षकांकडून हिरवा झेंडा
या भव्य मोटरसायकल रॅलीस जिल्हा पोलीस मुख्यालयातून अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते आणि विभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित यांनी हिरवा झेंडा दाखवून सुरुवात केली. रॅली दरम्यान, सहभागी महिलांच्या हातात ‘बेटी बचाव बेटी पढाव’चा संदेश देणारे फलक होते.

शहरभर जनजागृतीचा संदेश
ही रॅली शहरातील महत्त्वाच्या चौकांमधून मार्गक्रमण करत जिल्हा पोलीस मुख्यालयात परत आली. कोर्ट चौक, जुने बसस्थानक, अजिंठा चौफुली, आकाशवाणी चौक, स्वातंत्र्य चौक आदी ठिकाणी या रॅलीने लोकांचे लक्ष वेधले. नागरिकांनीही या उपक्रमाचे स्वागत करत पोलीस दलाच्या महिला अधिकाऱ्यांना प्रोत्साहन दिले.

पोलीस अधिकाऱ्यांची उपस्थिती
या वेळी शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड, रामानंद पोलीस ठाण्याचे निरीक्षक राजेंद्र गुंजाळ, शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक अनिल भवारी, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक बबन आव्हाड, राज्य राखीव दलाचे पोलीस निरीक्षक प्रशांत सुगरवार यांच्यासह महिला पोलीस कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Protected Content