अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर तालुक्यातील पाडळसरे धरण हे वर्षानुवर्ष रखडलेले असल्याने आणि संबंधित गावांचे पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लागत नसल्याने सात्री गावच्या आणखी एका महिलेचा बळी गेला. शासनाच्या अनावस्थेमुळे धरण व संबंधित गावांचे लोकांचे वित्त -जीविताचे प्रश्न निर्माण झाले आहे. धरण व पुनर्वसनासाठी गतीमानतेने निधी द्या, संबंधित कुटूंबाला मदत द्या! अन्यथा व्यापक जनआंदोलन उभारणार, असा इशारा पाडळसरे धरण समितीने तहसीलदार मिलिंद वाघ यांची भेट घेऊन संतप्त भावना व्यक्त करीत दिला. तर जिल्हाधिकारी यांनाही इ-मेलने निवेदन देण्यात आले आहे.
अमळनेरचे वर्षानुवर्षे निधीअभावी रखडलेल्या पाडळसरे धरणाची किंमत ५ हजार कोटी रुपयांच्यावर झालेली असून एकीकडे धरणाचे काम पूर्ण होत नाही आणि दुसरीकडे धरणाशी संबंधित व परिसरातील गावांचे पुनर्वसनही गतिमानतेने होत नाही. त्यामुळे संबंधित गावकऱ्यांना वित्त व जीवित हानीला सामोरे जावे लागत आहे. नुकतेच सात्री गावची एक महिला यामुळेच उपचाराअभवी दगावली. मागील वर्षी ही एक मुलगी अशीच मृत्युमुखी पडली होती. यामुळे जनतेत मोठा रोष निर्माण झाला आहे. अश्या संतप्त भावना तहसिलदार मिलिंद वाघ यांच्या दालनात पाडळसरे धरण जनआंदोलन समितीचे प्रमुख सुभाष चौधरी, सामाजिक कार्यकर्ते रणजित शिंदे, निंभोरा गावाचे सरपंच समितीचे सदस्य सुनिल पाटील, देविदास देसले, महेश पाटील यांनी व्यक्त केल्यात. याप्रसंगी तहसीलदार यांनी सात्री गावाचे प्रश्न सोडवण्यासाठी जिल्हाधिकारी यांचेकडे तातडीची बैठक होणार आहे. त्यात समितीच्या मागणीचा विषय घेऊ असे आश्वासन दिले. यावेळी राजेंद्र देसले, प्रसाद चौधरी यांचेसह तहसील कार्यालय येथे समितीचे अजयसिंग पाटील, रविंद्र पाटील, वसुंधरा लांडगे आदिंसह कार्यकर्ते उपस्थित होते.
अन्यथा, व्यापक जनआंदोलन उभारणार
शासनाने तातडीने धरण संबंधित गावांना व पाडळसरे धरणासाठी तसेच आवश्यक त्या पुनर्वसनासाठी निधी उपलब्ध करून, काम अत्यंत गतिमानतेने करावी तसेच संबंधित कुटुंबाला योग्य ती मदत करावी अशी मागणी समितीने केली आहे. सदर प्रश्नी प्रसंगी समिती रस्त्यावर उतरून व्यापक जन आंदोलन उभं करेल, असा इशारा दिलेल्या लेखी निवेदनात देण्यात आला आहे. सदर निवेदन जिल्हाधिकारी जळगांव यांनाही समितीने इ-मेल द्वारे पाठविण्यात आले आहे.