पुणतांब्यातील कृषीकन्यांना रूग्णालयात हलविले

नगर प्रतिनिधी । शेतकर्‍यांच्या विविध मागण्यांसाठी अन्नत्याग आंदोलन करणार्‍या कृषीकन्यांना रूग्णालयात हलविण्यात आले असून प्रशासनाने दडपशाहीने ही कारवाई केल्याचा आरोप होत आहे.

याबाबत वृत्तांत असा की, किसान क्रांती मार्फत पुणतांब्यापासून सुरु झालेल्या शेतकरी संपाच्या आंदोलनाच्या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिष्टमंडळासोबत केलेल्या चर्चेच्या वेळी शेतकर्‍याच्या बहुतांशी मागण्या मान्य केल्या होत्या. मात्र सरकारने अजूनही आश्‍वासनाची पूर्ती केली नाही. यामुळे सातबारा कोरा करावा, हमीभावासाठी स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशीची अंमलबजावणी करावी, दूधाला किमान ५०रुपये लिटर भाव द्यावा, कृषीपंपासाठी २४ तास विद्युत पुरवठा करावा यासह अनेक मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी किसान क्रांतीमार्फत पुणतांबा परिसरातील महिला व कृषी कन्यांनी पुणतांबा येथील स्टेशन रोडलगत असलेल्या किसान क्रांती मैदानात अन्नत्याग आंदोलन सुरू केले होते. यात शुंभागी संजय जाधव साक्षी राजेंद्र जाधव पूनम राजेंद्र जाधव दिपाली सुधाकर जाधव गायत्री मधुकर जाधव ज्ञानेश्‍वरी संजय शेरकर, गीता अभय धनवटे, श्रेया प्राणिल शिंदे, पल्लवी प्रशांत डोखे समीक्षा प्रशांत डोखे सह अनेक कृषी कन्या सहभागी झाल्या होत्या.

दरम्यान, सरकारने या आंदोलनाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप केला जात असतांनाच रात्री उशीरा प्रशासनाने या तरूणींना रूग्णालयात दाखल करण्यात आल्याचे वृत्त आहे. याप्रसंगी प्रशासनाने पोलीस बळाचा वापर केल्याचा आरोप पुणतांबा येथील ग्रामस्थांनी केला असून हे आंदोलन नव्याने सुरू करण्याचा इशारा दिला आहे.

Add Comment

Protected Content