भडगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | विलेपार्ले (मुंबई) येथील जैन मंदिर बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून १६ एप्रिल रोजी अनधिकृतपणे आणि क्रूर पद्धतीने पाडण्यात आल्याच्या घटनेचा सकल राजस्थानी जैन समाज भडगावच्या वतीने तीव्र निषेध करण्यात आला.
या घटनेच्या पार्श्वभूमीवर जैन समाजातील विविध संघटनांनी तहसीलदारांना निवेदन देऊन दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली. निवेदनात म्हटले आहे की, मंदिर पाडताना तेथील धार्मिक ग्रंथ, पूजा साहित्याची विटंबना झाली असून प्रतिष्ठित मूर्तींची तोडफोड करण्यात आली. यामुळे संपूर्ण देशभरातील जैन समाजात संतापाची लाट उसळली आहे. या घटनेत जबाबदार अधिकाऱ्यांची चौकशी करून त्यांना तात्काळ निलंबित करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच उध्वस्त केलेले मंदिर पूर्ववत जागेवर पुन्हा बांधण्याचीही विनंती करण्यात आली.
जैन समाजाने धार्मिक स्थळांना कायमस्वरूपी संरक्षण देणारा कायदा करण्याची, संंथ-साधूंना पदभ्रमण दरम्यान संरक्षण देण्याची, तसेच देशभरातील प्रमुख तीर्थक्षेत्रांवरील अडथळे दूर करण्यासाठी केंद्र सरकारने पावले उचलावीत, अशी विविध मागण्या निवेदनात मांडल्या आहेत. अल्पसंख्यांक व अहिंसावादी जैन समाजावर सातत्याने होणारे अन्याय, हल्ले, विटंबना आणि समाजकंटकांकडून होणारे अपमान याबाबत तात्काळ उपाययोजना करण्याची विनंतीही यामध्ये करण्यात आली.
या निवेदनावर संघपती मदनलाल लुणावत, अध्यक्ष आनंदकुमार चोरडिया, उपाध्यक्ष प्रकाशचंद भंडारी, अभयकुमार भंडारी, सुभाषचंद राका, समीर जैन, पुनम छाजेड, तसेच नवयुवक मंडळाचे अध्यक्ष प्रिंतम भंडारी, उपाध्यक्ष दर्शन जैन, सचिव शुभम सुराणा यांच्यासह जैन समाजातील अनेक मान्यवरांनी स्वाक्षरी केली. या वेळी मोठ्या संख्येने जैन समाज बांधव उपस्थित होते.