पुणे प्रतिनिधी । आपल्या विविध मागण्यांसाठी आंदोलन करणार्या कर्णबधीर तरूणांवर काल रात्री पोलिसांनी अमानुष लाठीमार केल्यामुळे सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे.
राज्यातील कर्णबधिरांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी सोमवारी असोसिएशनच्यावतीने अपंग कल्याण आयुक्तालयाबाहेर धरणे आंदोलन करण्यात आले. दरम्यान, आयुक्तालय प्रशासनाकडून कोणतीही लेखी हमी न मिळाल्याने आंदोलकांनी थेट मुंबईकडे पायी जाण्याचा निर्णय घेऊन आयुक्तालयापासून मोर्चा वळविला. त्या वेळी पोलिसांनी त्यांना अडविण्याचा प्रयत्न केला. मात्र, आंदोलकांनी त्यांच्या भूमिकेवर ठाम राहून प्रवास सुरू ठेवला. पोलिसांना डावलून आंदोलक पुढे जाण्याचा प्रयत्न करीत असताना, त्यांना थोपविण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केला. दरम्यान, आज सकाळीदेखील आंदोलक आपल्या मागण्यांवर ठाम असून आता सरकारने थेट जीआर घेऊनच आपल्यासोबत बोलणी करावी अशी मागणी त्यांनी केली आहे.
या लाठीमाराचा राजकीय वर्तुळातून तीव्र निषेध करण्यात येत आहे. आंदोलक नव्हे, तर हे सरकारच मूकबधिर असून, गृहमंत्री या नात्याने मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणी राजीनामा द्यावा, अशी मागणी विरोधकांकडून करण्यात येत आहे.