Home Uncategorized त्र्यंबकेश्वरमधील पत्रकारांवरील हल्ल्याचा मुक्ताईनगरात निषेध !

त्र्यंबकेश्वरमधील पत्रकारांवरील हल्ल्याचा मुक्ताईनगरात निषेध !

0
171

मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । त्र्यंबकेश्वर येथे कुंभमेळ्याचे वार्तांकन करण्यासाठी गेलेल्या पत्रकारांवर स्थानिक गुंडांनी केलेल्या भ्याड हल्ल्याचा मुक्ताईनगर तालुका इलेक्ट्रॉनिक मीडिया पत्रकार संघटनेने तीव्र निषेध केला आहे. या प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करत संघटनेने आज तहसीलदार आणि पोलीस निरीक्षकांना निवेदन सादर केले.

निवेदनात म्हटले आहे की, हल्ल्यात सामील असलेल्या गुंडांवर पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत कठोर कारवाई करून गुन्हे दाखल करावेत. तसेच, प्रवेशकर वसुली करणाऱ्या ‘ए. एस. मल्टी सर्विसेस’ या कंपनीच्या मालकावरही गुन्हा दाखल करून कंपनीला काळ्या यादीत टाकण्यात यावे आणि भविष्यात महाराष्ट्रात कुठेही कोणताही ठेका देण्यात येऊ नये, अशी मागणी करण्यात आली.

नोव्हेंबर २०१९ मध्ये पत्रकार संरक्षण कायदा लागू झाल्यानंतरही राज्यात ३०० हून अधिक पत्रकारांवर हल्ले झाले आहेत. मात्र, यापैकी केवळ ४३ प्रकरणांमध्येच या कायद्याचा वापर झाला आहे. या आकडेवारीवरून सरकारकडून कायद्याच्या अंमलबजावणीत दुर्लक्ष होत असल्याचा आरोपही पत्रकारांनी केला आहे. त्यामुळे गृह मंत्रालयाने पत्रकार संरक्षण कायद्यांतर्गत प्रकरणांची चौकशी करण्यासाठी एक स्वतंत्र समिती स्थापन करावी आणि सर्व प्रलंबित प्रकरणांची सखोल चौकशी करावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.

या निषेध निवेदनावेळी मुक्ताईनगर तालुका इलेक्ट्रॉनिक मीडिया पत्रकार संघटनेचे अध्यक्ष पंकज कपले, उपाध्यक्ष अक्षय काठोके, सचिव विठ्ठल धनगर, विनायक वाडेकर, सचिन झनके, किरण पाटील, अतिख खान, पंकज तायडे, सुभाष धांडे, रवी गोरे, सुमित बोदडे आणि मंगेश ढोले आदी उपस्थित होते.


Protected Content

Play sound