मुंबई प्रतिनिधी । नुकत्याच राजकारणात सक्रीय झालेल्या प्रियंका गांधी या नंदुरबारातून आगामी लोकसभा निवडणुकीसाठी रणशिंग फुंकणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.
२३ जानेवारी रोजी प्रियंका गांधी या अधिकृतपणे काँग्रेस पक्षात सक्रीय होणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. तेव्हा त्या विदेशात होत्या. रात्री उशीरा त्या दिल्ली येथे परतल्या असून येत्या काही दिवसांमध्ये त्या प्रत्यक्ष राजकारणात सक्रीय होतील अशी अपेक्षा आहे. दरम्यान, प्रियंका या महाराष्ट्रातील नंदुरबार येथून आपल्या राजकीय कारकिर्दीतील पहिल्या सभेचा श्रीगणेशा करण्याची शक्यता आहे. नंदुरबार हा गत निवडणुकीचा अपवाद वगळता काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला राहिला आहे. येथून माणिकराव गावित यांनी सातत्याने विजय मिळवला होता. मोदी लाटेत गावित यांचा पराभव झाला होता.
दरम्यान, नंदुरबारशी गांधी घराण्याचे निकटचे नाते आहे. सोनिया गांधी यांनीदेखील येथूनच आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरूवात केली होती. या पार्श्वभूमिवर, प्रियंका गांधी यादेखील नंदुरबार येथे सभा घेऊन आपल्या राजकीय कारकिर्दीस प्रारंभ करतील असे मानले जात आहे. याबाबत काँग्रेस पक्षातर्फे लवकरच अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. असे झाल्यास सध्या मरगळलेल्या अवस्थेत असणार्या काँग्रेसमध्ये चैतन्याचे वारे संचारण्याची शक्यता आहे.