कराड-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाला लक्ष्य केले आहे.
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी कराडमध्ये पत्रकारांशी बोलतांना राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. ते म्हणाले की, राज्यात सन २०१४ मध्ये आघाडीचे सरकार कार्यरत असताना राष्ट्रवादी कॉंग्रेसने अचानकपणे सरकारचा पाठिंबा काढून घेतल्यामुळे सरकार पडले. या घटनेमुळे महाराष्ट्रातील भाजप वाढण्यास, सत्तेत येण्यास मदत झाली. एकप्रकारे यानंतर आलेले देवेंद्र फडणवीस यांचे सरकार राष्ट्रवादीमुळेच आल्याचा आरोप त्यांनी केला.
पृथ्वीराज चव्हाण पुढे म्हणाले की, राष्ट्रवादी कॉंग्रेसने हे सरकार पाडले नसते तर पुन्हा आघाडीचेच सरकार सत्तेत आले असते. मात्र तसे न झाल्यामुळे याचा फायदा भाजपला झाला. यातूनच एकप्रकारे राज्यात भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांचे सरकार सत्तेवर यायला कोण कारणीभूत हे सगळयांना समजले. तसेच, कॉंग्रेस पक्षाध्यक्षपदाची निवडणूक लोकशाही मार्गाने पार पडल्यामुळे ‘जी २३’चा मुख्य हेतू सफल झाला. पण, निर्णयाला उशीर झाल्याने अनेक जण पक्ष सोडून गेल्याची खंत चव्हाण यांनी व्यक्त केली. हिमाचल प्रदेश, गुजरात राज्यांच्या निवडणुकांसह येत्या लोकसभा निवडणुकीला कॉंग्रेस नियोजनाने समोरे जाईल असा विश्वास चव्हाण यांनी दिला.