पारोळा,प्रतिनिधी | तालुक्यातील शेळावे येथे आज (दि.२९) नुकत्याच पार पडलेल्या शेळावे केंद्राच्या शिक्षण परिषदेत जि.प. प्राथमिक शाळा धाबे (ता.पारोळा) येथील राज्य आदर्श शिक्षक व मुख्याध्यापक मनवंतराव भिमराव साळुंखे यांनी शिक्षण परिषदेच्या धोरणानुसार स्वतः आयोजक शाळेच्या शिक्षकांच्या मदतीने उत्कृष्ट असा नमुना परिपाठ सादर केला म्हणुन त्यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष केंद्र प्रमुख जितेंद्र पवार, राष्ट्रपती पुरस्कार विजेत्या श्रीमती पाकिजा पटेल, महाराष्ट्र राज्य पदवीधर शिक्षक महासंघाचे राज्याध्यक्ष गिरीष वाणी, पारोळा प्राथमिक शिक्षक संघटनेचे तालुकाध्यक्ष गुणवंतराव पाटील, मुख्याध्यापक जगदिश पाटील व भुषण पाटील यांनी रोख ५०१ रुपये, शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करून अभिनंदन केले.
मुख्याध्यापक साळुंखे यांनी शालेय कामकाजात परिपाठ हा मुल्य शिक्षणासाठी किती महत्वाचा आहे, हे स्पष्ट केले. राष्ट्रगीत ते मौन या परिपाठातील सर्व मुल्यांचे महत्व सांगत तो कसा उत्कृष्ट करता येईल याचे सुंदर स्पष्टिकरण केले. मुख्याध्यापक साळुंखे हे अगोदर होणारे प्रत्येक गटसंमेलन व आता शिक्षण परिषदेत सक्रिय सहभाग घेतात व गेल्या २२ वर्षापासुन दरवेळी विदयार्थ्यांना रोख व शैक्षणिक साहित्य देण्याचा उपक्रम राबवितात.
शिक्षकांचे कौतुक करणाऱ्या या स्तुत्य उपक्रमाबद्दल गट शिक्षणाधिकारी श्रीमती कविता सुर्वे यांनी आपल्या अभिनंदनपर संदेशात म्हटले की, शिक्षण परिषदेचा उद्देशच हा आहे की शिक्षकांनी स्वतःला अवगत ज्ञानाचे इतरांमध्ये आदान प्रदान करून शैक्षणिक विचार मंथन करणे. मुख्याध्यापक साळुंखे यांनी नुकताच जिल्हयातील प्रथमच वॉटर बेल उपक्रम सुरू केला व इतरही शैक्षणिक सामाजिक व राष्ट्रीय उपक्रम छान राबवित आहेत. त्यांचे कार्य राज्य आदर्श शिक्षक पुरस्काराला साजेसे आहे.