प्राचार्य काटे दांपत्यासह मुलीचा दिल्लीत सत्कार

जळगाव प्रतिनिधी । प्राचार्य डॉ. अविनाश काटे व त्यांच्या पत्नी वैशाली काटे आणि मुलगी अविवा काटे यांचा दिल्ली येथे 422 मैदानी मिल्ट्री हॉस्पिटलमध्ये सन्मान करण्यात आला.

जळगावातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाप्रमाणे या काटे कलावंतांनी दिल्लीतील मिल्ट्री हॉस्पिटलमध्ये मोफत आकर्षक चित्र, रंगरंगोटी व सजावट केल्यामुळे त्या हॉस्पिटलचा चेहरामोहरा बदलला. या सुंदर कलाकृतीबाबत त्यांचा सत्कार सेना मेडल नायक कर्नल डॉ. राजेश अढाऊ यांच्या हस्ते झाला.

प्राचार्य डॉ.अविनाश काटे, त्यांच्या पत्नी व मुलीने जळगावातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील भींती, आतील भाग व परिसरात विनाशुल्क विविध कलाकुसर केली. त्यामुळे महाविद्यालय व परिसराला नवा ‘लुक’ मिळाला. या कलाकृतीची माहिती दिल्लीतील मिल्ट्री हॉस्पिटलच्या प्रशासनाला कळाली. त्यांनी प्राचार्य डॉ.काटे यांच्याशी संपर्क साधला. त्यांना दिल्लीला बोलावून घेतले. त्यांच्याकडून मिल्ट्री हॉस्पिटलच्या भींती, आतील भाग व बाहेरील परिसरात नावीण्यपूर्ण कलाकृती करुन घेतली.

 

कारगिलमध्येही साकारणार कलाकृती

काटे कलावंत कुटुंबियांनी दिल्लीतील 422 (एएमसी) आर्मी मेडिकल कोरमध्ये आपल्या कलात्मक प्रतिभेने सर्व मिल्ट्री जवानांचे मन जिंकले. त्यांना त्यातील एक चित्र मिल्ट्रीचे रेजिमेंट सेंटर जबलपूर येथे आजीवन ठेवण्याचा सन्मान मिळाला आहे. या कलाकारांच्या उत्कृष्ट कार्याबद्दल त्यांचा सन्मान सेना मेडल नायक कर्नल डॉ. राजेश अढाऊ यांच्या हस्ते करण्यात आला. कर्नल डॉ.अढाऊ यांनी हॉस्पिटलमधील कलाकृती बघितल्यानंतर कलावंताचा गौरव केला. कर्नल डॉ.अढाऊ यांनी काटे दांपत्याला कारगिलमध्ये कलाकृती साकारण्यासाठी आमंत्रित केले आहे. त्यामुळे हे कलावंत कारगीलमध्ये सैनिकांसाठी देशभक्तीपर प्रेरणादायी अनोखी कलाकृती मोफत साकारणार आहेत. ही बाब जळगावकरांसाठी निश्‍चितच अभिमानास्पद आहे.

 

Protected Content