मुंबई प्रतिनिधी | माजी मंत्री एकनाथराव खडसे हे ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी जाण्याआधी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या कार्यालयात पत्रकार परिषद घेणार असल्याची माहिती पक्षातर्फे देण्यात आली होती. मात्र प्रकृती बिघडल्यामुळे त्यांची ही पत्रकार परिषद रद्द करण्यात आल्याचे पक्षाने जाहीर केले आहे.
माजी मंत्री तथा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांचे जावई गिरीश दयाराम चौधरी यांना काल सक्तवसुली संचलनालय अर्थात ईडीने अटक केली आहे. त्यांना पाच दिवसांची कोठडी देखील सुनावण्यात आली आहे. या प्रकरणी खुद्द खडसे आणि त्यांच्या सौभाग्यवती मंदा खडसे यांच्यावरही कारवाईची शक्यता आहे.
या अनुषंगाने काल सायंकाळी एकनाथराव खडसे यांना उद्या अर्थात दिनांक ८ जुलै रोजी सकाळी अकरा वाजता ईडीच्या मुंबई येथील कार्यालयात चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. याबाबतचे समन्स त्यांना जारी करण्यात आले आहे. ते ईडीच्या कार्यालयात जाण्याआधी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या प्रदेश कार्यालयात पत्रकार परिषद घेणार असल्याचे पक्षाने जाहीर केले आहे. या पत्रकार परिषदेत ते भोसरी जमीन प्रकरणाशी संबंधीत माहिती देऊ शकतात. यासोबत ते काही गौप्यस्फोट देखील करण्याची शक्यता असल्याने या पत्रकार परिषदेकडे सर्वांचे लक्ष लागले होते.
दरम्यान, राष्ट्रवादी कॉंग्रेसने एका ट्विटच्या माध्यमातून एकनाथराव खडसे यांची प्रकृती बिघडल्यामुळे आजची पत्रकार परिषद रद्द करण्यात येत असल्याची माहिती दिली आहे. अर्थात, खडसे यांची बहुप्रतिक्षित पत्रकार परिषद रद्द करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते मा. एकनाथराव खडसे यांची प्रकृती खालावल्याने त्यांची उद्या दि. ८ जुलै रोजीची पूर्वनियोजित पत्रकार परिषद रद्द करण्यात येत आहे. माध्यमकर्मींनी कृपया याची नोंद घ्यावी. गैरसोयीबद्दल दिलगीर आहोत. धन्यवाद.
— NCP (@NCPspeaks) July 7, 2021