नवी दिल्ली वृत्तसंस्था । दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (दि.५) जानेवारीला झालेल्या हिंसाचाराचा सर्व डेटा, सीसीटीव्ही फुटेज आणि इतर पुरावे जपून ठेवण्याचे आदेश दिल्ली उच्च न्यायालयाने सोशल मीडिया आणि गुगलला दिले आहेत. या प्रकरणी याच विद्यापीठातील तीन प्राध्यापकांनी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावरील आज सुनावणी झाली असून न्यायालयाने हे आदेश दिले आहेत.
जेएनयू हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर दिल्ली उच्च न्यायालयाने दिल्ली पोलीस, फेसबुक, व्हॉट्सअॅप आणि गुगलला नोटीस पाठवली आहे. जेएनयूतील तीन प्राध्यापकांनी हिंसाचारावेळचे सीसीटीव्ही फुटेज, संदेश आणि इतर पुरावे जतन करण्यात यावे, या मागणीसाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. आज (सोमवारी) यासंदर्भात दिल्ली हायकोर्टात सुनावणी झाली. यावेळी दिल्ली पोलिसांनी हायकोर्टाला सांगितले की, जेएनयू प्रशासनाला ५ जानेवारी रोजी झालेल्या हिंसाचाराचे फुटेज संरक्षित ठेवण्यास आणि ते पोलिसांकडे सोपवण्यास यावे. मात्र, यावर अद्याप जेएनयू प्रशासनाकडून कुठलेही उत्तर आलेले नाही. त्याचबरोबर दिल्ली पोलिसांकडून व्हॉट्सअॅपला लिखित विनंती करुन त्या दोन व्हॉट्सअॅप ग्रुपवरील डेटा सुरक्षित ठेवण्यास सांगण्यात आले आहे. ज्या ग्रुपवर जेएनयूतील हिंसाचाराचा कट रचण्यात आला होता.