जिल्हाधिकारी कार्यालयात सामाजिक संरक्षण योजनेचे सादरीकरण

वरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | जळगाव येथे मागील वर्षीच्या सामाजिक संरक्षण योजनेच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष सादरीकरण आयोजित करण्यात आले. या सादरीकरणाला राजू लोखंडे (पीडीडीआरडीए) यांच्या उपस्थितीत पार पडले. या वेळी स्वस्ती फाउंडेशन बेंगलोर, टाटा एआयजी आणि नेटवर्क ऑफ महाराष्ट्र बाय पीपल लिविंग विथ HIV/AIDS या संस्थांच्या माध्यमातून करण्यात आलेल्या कार्याचा आढावा पीपीटीद्वारे सादर करण्यात आला. या सादरीकरणादरम्यान डॉ. किरण पाटील (सिव्हिल सर्जन, जळगाव सिव्हिल हॉस्पिटल) आणि डॉ. सुमित जैन (जिल्हा समन्वयक, आयुष्यमान भारत विभाग, जळगाव) यांना मागील वर्षभरात झालेल्या कार्याची माहिती देण्यात आली.

नेटवर्क ऑफ महाराष्ट्राद्वारे मागील आठ महिन्यांपासून सामाजिक संरक्षण योजना जळगाव जिल्ह्यात प्रभावीपणे राबवण्यात आली आहे. यामध्ये विशेषतः गरीब, मध्यमवर्गीय आणि अपंग व्यक्तींना विविध सरकारी योजनांचा लाभ मिळवून देण्यात आला. एन एम पी + या संस्थेच्या माध्यमातून प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (आयुष्यमान भारत), प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना, प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना, ई-श्रम कार्ड, मुख्यमंत्री सहाय्यता निधी या पाच योजनांचा लाभ गरजू लोकांपर्यंत पोहोचवण्यात आला.

या योजनांच्या अंमलबजावणीसाठी जिल्हा समन्वयक अनिता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बाह्य संपर्क कार्यकर्ते विकी सोनवणे, मयूर सोनवणे, धनश्री बाविस्कर, चंद्रकला सोनवणे, तेजस्विनी हुंडीवाले, कविता पाटील यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले. त्यांच्यासह जिल्ह्यातील 24 हजार गरजू नागरिकांना या योजनांचा प्रत्यक्ष लाभ मिळवून देण्यात आला. सदर सादरीकरणाच्या माध्यमातून सामाजिक संरक्षण योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीचा आढावा घेण्यात आला असून, भविष्यात या योजनांचा अधिकाधिक विस्तार करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.

Protected Content