आता जमाना ऑप्टीकल फायबरचा : साकेगावातील बीएसएनएल कार्यालय बंद !

साकेगाव, ता. भुसावळ-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | सध्या ऑप्टीकल फायबर तंत्रज्ञान वापरण्यात येत असल्याने येथील भारत संचार निगम लिमिटेडचे कार्यालय बंद करून सर्व उपकरणे हे मुख्यालयात जमा करण्यात आले आहेत.

साकेगाव येथील ग्रामपंचायत कार्यालयाच्या समोर बीएसएनएलचे कार्यालय कार्यरत होते. कधी काळी येथून गावातील सर्व लँडलाईन फोन्सचे संचलन होत असे. काळाच्या ओघात प्रत्येकाच्या हातात मोबाईल आल्यामुळे लँडलाईन फोन मागे पडत गेले. आता गावात मोजके लँडलाईन फोन कार्यरत आहेत. तर, जे लँडलाईन फोन आहेत, ते ऑप्टीकल फायबर तंत्रज्ञानावर चालत असल्याने त्यांना आधीच्या तांब्याच्या वायरवर चालणाऱ्या फोनसारख्या उपकरणांची आवश्यकता नसते.

या सर्व बाबींच्या पार्श्वभूमिवर, आज साकेगावातील बीएसएनएलच्या कार्यालयातील सर्व उपकरणे, यंत्रसामग्री आणि ऑफिसचा सामान हा जमा करून जळगाव येथील कार्यालयात पाठविण्यात आला. सर्व सिस्टीम अद्ययावत झाल्यामुळे बीएसएनएलच्या वतीने हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती याप्रसंगी कर्मचाऱ्यांनी दिली. या माध्यमातून आता बीएसएनएलचे साकेगावातील कार्यालय हे इतिहासजमा होणार आहे. याच्या आठवणी मात्र साकेगावकरांच्या हृदयात कायम राहतील हे मात्र नक्की !