आचारसंहितेपूर्वीच रक्षाताई खडसेंकडून प्रचाराला सुरुवात

रावेर (प्रतिनिधी)  लोकसभेची आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच भाजपाच्या प्रचाराचा डफ गावोगावी घुमू लागला आहे. रावेरच्या खासदार रक्षाताई खडसे यांनी आपल्या मतदारसंघात प्रचाराला सुरुवात केली असून सध्या त्या चोपडा तालुक्यातील विविध गावांमध्ये भेटी देऊन विकासकामांचे भूमिपूजन करीत आहेत.

लोकांना आपल्या गावात खासदार आले आहेत, हे कळावे म्हणून त्यांनी डफाचा आधार घेतला आहे. तसे बघितले तर पूर्वीपासूनच गावांमध्ये महत्वाची सूचना किंवा राज्याचे आदेश जनतेपर्यंत पोचवण्यासाठी डफ वाजवून दवंडी दिली जात असे. त्याच धर्तीवर आजच्या आधुनिक काळातही डफ वाजवून लोकांना गोळा केले जाणे उल्लेखनीय आहे. या डफ प्रचारामुळे पाच वर्षानंतर येणाऱ्या निवडणुकांत यंदा डफ वाल्यांचा उन्हाळा चांगला जाईल, अशी त्यांची भावना आहे. रावेर मतदार संघातून निवडणूक लढण्यासाठी भाजपातर्फे रावेरचे विद्यमान आमदार हरिभाऊ जावळे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष दिलीप खोडपे हे ही इच्छुक असुन भाजपाची उमेदवारी मिळविण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. या सगळ्याच इच्छुक उमेदवारानी आतापासूनच प्रचारावर भर दिला असून मतदारांच्या गाठी-भेटी घेणे सुरु केले आहे. असे असले तरी उमेदवारीची माळ नेमकी कुणाच्या गळ्यात पडते, ते कळायला आणखी काही दिवस वाट बघावी लागणार आहे.

Add Comment

Protected Content