जळगावात खरीप पूर्व कृषी निविष्ठा कार्यशाळा; शेतकऱ्यांना मार्गदर्शन

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवनात आज (सोमवारी) खरीप हंगाम पूर्व जिल्हास्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या महत्त्वपूर्ण कार्यशाळेत कृषी निविष्ठा उत्पादक आणि विक्रेत्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. वस्त्र उद्योग मंत्री संजय सावकारे आणि जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्यासह अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाची सुरुवात पारंपरिक पद्धतीने दीपप्रज्वलनाने झाली, त्यानंतर बळीराजाच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी पदमनाथ मस्के यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना केली, ज्यामध्ये त्यांनी कार्यशाळेच्या उद्देशावर प्रकाश टाकला. यानंतर मान्यवरांनी विविध महत्त्वाच्या विषयांवर मार्गदर्शन केले. माती परीक्षण आणि जमीन आरोग्य पत्रिकेनुसार खतांचा योग्य वापर कसा करावा, बियाण्यांवर प्रक्रिया करण्याचे महत्त्व, ई-पॉस प्रणालीद्वारे खतांचा साठा आणि खतांच्या वापराचा सध्याचा ट्रेंड, संतुलित खतांचा वापर, बियाण्यांची विक्री आणि साठवणूक करताना घ्यावयाची विशेष काळजी, तसेच कापूस बियाणांसंबंधी येणाऱ्या तक्रारींवर काय कार्यवाही करावी आणि त्याची कार्यपद्धती काय असावी, याबद्दल सखोल मार्गदर्शन करण्यात आले. यासोबतच, शेतात कीटकनाशके वापरताना कोणती खबरदारी घ्यावी आणि विषबाधा झाल्यास त्वरित काय उपाययोजना कराव्यात, यावरही तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले.

या महत्त्वपूर्ण कार्यक्रमाला कृषी विकास अधिकारी पदमनाथ मस्के, मुमराबाद येथील कृषी विज्ञान केंद्राचे शरद जाधव, महाबीजचे अधिकारी संजय देवरे, जिल्हा गुणवत्ता नियंत्रक निरीक्षक विकास बोरसे, मोहीम अधिकारी विजय पवार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कुरबान तडवी यांच्यासह कृषी क्षेत्रातील अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यशाळेमुळे कृषी निविष्ठा उत्पादक आणि विक्रेत्यांना खरीप हंगामाच्या पूर्वतयारीसाठी आवश्यक माहिती देण्यात आली.

Protected Content