धरणगाव प्रतिनिधी । धरणगाव- चोपडा राज्य महामार्गावर रोटवदजवळ प्रवासी रिक्षा उलटल्याची घटना शुक्रवारी सकाळी 10.30 वाजेच्या सुमारास घडली. या अपघातातील प्रवासी विद्यार्थी रुपेश प्रकाश गायकवाड वय 17 रा. बजरंग चौक, धरणगाव या विद्यार्थ्यांचा जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला असून रुपेशचा मित्र गणेश अंकुश कोळी हा जखमी असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत. रुपेशच्या छातील दुखत असल्याबाबत कुटुंबियांनी डॉक्टरांना कळविले होते, मात्र अर्धातास उलटूनही डॉक्टरांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याने डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे रुपेशचा मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबियांनी केला आहे.
चोपडा तालुक्यातील वेल्हे येथे औद्योगिक प्रशिक्षण केंद्रात रुपेश गायकवाड शिक्षण घेत आहे. यासाठी तो रोज रिक्षाने अपडाऊन करतो. शुक्रवारी नेहमीप्रमाणे मित्र गणेश याच्यासोबत रिक्षातून रुपेश वेल्हे येथे जाण्यासाठी निघाला. नांदगाव ते रोटवद गावादरम्यान रिक्षा अचानक उलटली. यात गंभीर जखमी असलेल्या गणेश कोळी व रुपेश यास इतरांनी तातडीने जिल्हा रुग्णालयात हलविले. याठिकाणी त्याच्या उपचार सुरु होते. दुपारी 2 वाजेच्या सुमारास अचानकपणे रुपेशच्या छातीत अचानक पण दुखायला लागले. कुटुंबियांना त्याने सांगितले. कुटुंबियांनी याबाबत कर्तव्यावर असलेल्या वैद्यकीय अधिकार्याला माहिती दिली. वैद्यकीय अधिकार्याने काहीही त्रास नसून पेशंट नॉर्मल असल्याचे सांगितले व दुर्लक्ष केले. यानंतर तासाभराने रुपेशचा मृत्यू झाला. डॉक्टराच्या हलगर्जीपणामुळे रुपेशचा मृत्यू झाला असल्याचा आरोप नातेवाईकांनी पत्रकारांशी बोलतांना केला आहे. याप्रकरणी पोलिसात नोंद करण्यात आली आहे.