जळगाव प्रतिनिधी – पाकिस्तानी लष्कराच्या संरक्षणात असलेला जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या मसूद अझहर याला 10 वर्षांत चौथ्यांदा वाचविणार्या चीनची नांगी ठेचण्याचा विडा श्री स्वामी विवेकानंद बहुउद्देशीय मंडळाने उचचला असून पुन्हा एकदा चीनी मालावर बहिष्कार टाकण्याचे आंदोलन हाती घेण्यात आले आहे. मसूद अझहरला वाचवून दहशवाद्यांचे समर्थन करणार्या चीनने आपली भारतविरोधी वृत्ती पुन्हा एकदा दाखवून दिली असून मंडळाचे अध्यक्ष कैलास सोनवणे यांच्या नेतृत्त्वाखाली देशभक्त नागरिकांनी गुरूवारी सायंकाळी महाराणा प्रताप चौकात एकत्र येवून चीनच्या झेंड्याचे दहन केले. भारताच्या दहशतवादविरोधी लढ्यात चीनी ड्रॅगनने पुन्हा एकदा गरळ ओकली असून संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेत दहशतवादी मसूद अझहरला जागतिक दहशतवाद्यांच्या यादीत समाविष्ट करण्याच्या अमेरिका, ब्रिटन व फ्रान्सने मांडलेल्या प्रस्तावावर चीनने व्हेटो वापरला. बुधवारी जर्मनीनेही असाच प्रस्ताव मांडला होता. मात्र, मसूदला दहशतवादी घोषित करण्यापूर्वी एक तास चीनने तांत्रिक कारण पुढे करत आडकाठी आणली. पुराव्याशिवाय कारवाईस आपला विरोध असल्याचे चीनने स्पष्ट केले. तीन दिवसांपूर्वीही चीनने हीच भूमिका मांडली होती. चीनने 2009, 2016 आणि 2017 मध्येही मसूदला जागतिक दहशतवादी जाहीर करण्याच्या विरोधात वीटोचा वापर केला आहे.
चीनला बसला होता झटका
गेल्या वर्षी देखील चीनला इंगा दाखविण्यासाठी कैलास सोनवणे यांच्या नेतृत्त्वाखाली श्री स्वामी विवेकानंद बहुउद्देशीय मंडळातर्फे जळगावात चिनी मालावर बहिष्कार टाकण्यात आला होता. जळगावात सुरू झालेले हे आंदोलन पुढे देशभर सुरू झाले होते. देशभरातून चीन माल हटविण्यात आल्याने चीनला मोठा आर्थिक फटका बसला होता. त्यानंतर चीनने काही काळ मवाळ भुमिका घेतली होती.
चीनी ड्रॅगनला जळगावकर दाखविणार इंगा
भारतीय जवानांच्या रक्ताने होळी खेळणार्या दहशतवाद्यांचे समर्थन करणार्या चीनच्या पिचकार्या आणि रंग बाजारात दाखल झाले आहे. गेल्यावेळी जळगावकर देशभक्तांनी दाखविलेल्या एकजुटीमुळे चीनी ड्रॅगनला झटका बसला होता. यावेळी देखील नागरिकांनी चीनच्या मालावर बहिष्कार टाकत आपली प्रखर देशभक्ती दाखविण्याची गरज आहे. व्यवसायासोबतच देश महत्त्वाचा असेल तर जळगाव जिल्ह्यातील व्यापार्यांनी चीनी माल खरेदी-विक्री बंद करण्याचे आवाहन श्री स्वामी विवेकानंद बहुउद्देशीय मंडळाचे अध्यक्ष कैलास सोनवणे यांनी केले आहे.
पाकीस्तान मुर्दाबाद, चीनी ड्रॅगन मुर्दाबाद
श्री स्वामी विवेकानंद बहुउद्देशीय मंडळातर्फे गुरूवारी सायंकाळी 5 वाजता महाराणा प्रताप चौकात चीनचा झेंडा जाळण्यात आला. यावेळी भारत माता कि जय, वंदे मातरम, बॉयकॉट चायना, चिनी ड्रॅगन मुर्दाबाद, हिंदुस्तान जिंदाबाद, पाकीस्तान मुर्दाबाद, पाकीस्तान मिटाओ, चीनी हटाओ अशी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी मंडळाचे अध्यक्ष तथा नगरसेवक कैलास सोनवणे, धुडकु सपकाळे, ललित कोळी, भरत कोळी, शाहिद शेख, जीवन तायडे, कवी कासार, मनोज सपकाळे, घनश्याम खडके, मनोज गवळी, कृष्णा गवळी, जय गवळी, बाळू सोनार, कमलाकर चौधरी, कैलास वाघ, राकेश लोहार, नंदू महाजन, राहुल सपकाळे, अश्विन शंखपाळ, राजेंद्र सपकाळे, मनोज चौधरी आदींसह शेकडो देशभक्त नागरिक उपस्थित होते.