जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । दाट वृक्षाखाली..ती पाहा पावन खिंड.. हीच ती वाट..याच वाटेवर रक्ताचे आणि घामाचे थेंब..खिंड उंच.. वाट अरुंद..घटसर्पाने घसा आवळला होता…बाजीप्रभू कळवळून म्हणाला महाराज थांम्बु नका.. तुम्ही निघा गडा कडे मी खिंड रोखतो.. अश्या प्रकारे वर्णन करीत.. श्रोत्यांवर रोमांच उभा करीत पावर पाइन्ट प्रझेंटेशनद्वारे शिवअभ्यासक डॉ.प्रमोदकुमार हिरे यांनी पावनखिंडीची लढाई विद्यापीठाच्या अधिसभागृहात अक्षरशः जिंवत केली. निमित्त होते शिवजयंतीचे.
एक उत्कृष्ट संघटक, प्रशासक, लोककल्याणकारी राजा म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांची ओळख असून महाराजांनी केवळ स्वप्ने बघितली नाहीत त्यांनी कार्याला महत्व दिले स्वराज्यासाठी स्वत:च्या प्राणाची आहुती देणारी मावळयांची फौज उभारुन कमीत कमी फौजेच्या जोरावर कमीत कमी वेळेत शत्रूपक्षाचा संपूर्ण पराभव हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावनखिंडीत मिळालेल्या यशाचे सुत्र होते म्हणून त्यांना जाणता राजा म्हटले जाते असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले.
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्यावतीने रविवार दि.१९ रोजी छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त अधिसभा सभागृहात डॉ. प्रमोदकुमार हिरे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. “पावनखिंड” देदिप्यमान इतिहास” हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरु प्रा.व्ही.एल.माहेश्वरी होते. यावेळी मंचावर प्र-कुलगुरु प्रा.एस.टी.इंगळे, कुलसचिव डॉ.विनोद पाटील, विचारधारा प्रशाळेचे प्रभारी संचालक प्रा.म.सु.पगारे, छत्रपती शिवाजी महाराज अध्यासन व संशोधन केंद्राचे समन्वयक प्रा. डॉ.अजय पाटील तर छत्रपती शिवाजी महाराजांचया वेशभूषेत महेश चौधरी व जिजाऊंच्या वेशभूषेत श्रेया पाटीलसह बाल जिजाऊ जान्हवी सोनवणे उपस्थित होते.
आपल्या दीड तासाच्या व्याख्यानात डॉ.हिरे यांनी पीपीटी सादरीकरणाद्वारे केवळ ६०० मावळयांसह केलेले पावनखिंडीतले युध्द प्रसंगाचे विवेचन, महाराजांचे विशालगडाकडे प्रयाण त्यासाठी आखलेली योजना, मुसळधार पावसाळयातील गडद अंधाराची रात्रीत केलेली वाटचाल आदी सविस्तर माहिती देतांना विविध प्रसंग श्रोत्यांसमोर मांडले. सिध्दी जौहर हा औरंगजेबाचा उत्तम सेनापती होता. मात्र त्यालाही गाफील ठेवत शिवाजी महाराज पन्हाळगडावरुन विशालगड कडे रवाना झाले त्यावेळी जौहरच्या भेटीप्रसंगी महाराजांच्या वकीलांनी त्यास शब्दात अडकवून गाफील ठेवण्याची योग्य ती काळजी घेतली. बाजीप्रभू आणि फूलाजीप्रभू या दोघा देशपांडे भावांसारखे प्राणाची आहुती देणारे सरदार महाराजांनी तयार करुन, युध्दे जिंकून स्वराज्य निर्मितीची नांदी घातली असे डॉ. हिरे म्हणाले.
हिरे यांनी आपल्या दिडतासाच्या भाषणात सर्व विद्यार्थ्यांना खिळवून ठेवले. अध्यक्षीय भाषणात कुलगुरु प्रा. व्ही.एल. माहेश्वरी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार केवळ मिरवणूकीपूरता मर्यादित न ठेवता कायमस्वरुपती अंमलात आणणे गरजेचे आहे असे प्रतिपादन केले.
प्रारंभी राज्य गीत वाजविण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज अध्यासन व संशोधन केंद्राचे विभाग प्रमुख डॉ.अजय पाटील यांनी प्रास्ताविक केले. अक्षय महाजन यांनी पोवाडा तर शुभम गिरी व नेहा बाफना यांनी गीत सादर केले. पूर्वी बावीस्कर या हिने बालनृत्य सादर केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन महेश सुर्यवंशी यांनी केले. आभार डॉ.दीपक सोनवणे यांनी मानले. सकाळी ज्ञानस्त्रोत केंद्रात अतिथींच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.