प्रवीण चव्हाणांचा राजीनामा : बीएचआर प्रकरणावर काय होणार परिणाम ?

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज स्पेशल रिपोर्ट | देवेंद्र फडणवीस यांनी सादर केलेल्या पेन ड्राईव्ह प्रकरणाने अखेर विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांच्या पदाचा बळी घेतला असून यामुळे आता त्यांच्याकडे असणार्‍या बीएचआर प्रकरणाचे काय होणार ? याबाबत संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.

गेल्या मंगळवारी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत पेन ड्राईव्ह बॉंब टाकल्याने राज्याच्या राजकारणात प्रचंड खळबळ उडाली. यात विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण हे भाजपचे आमदार गिरीश महाजन यांना मोक्कामध्ये अडकवण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे स्टींग ऑपरेशन करण्यात आले होते. त्यांच्या बोलण्यात गृहमंत्री अनिल देशमुख, माजी मंत्री एकनाथराव खडसे, माजी आमदार अनिल गोटे आदी राष्ट्रवादीच्या नेत्यांचे संदर्भ येत असल्याचे दिसून आल्याने फडणवीस यांनी सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले होते. नंतर प्रवीण चव्हाण यांनी या प्रकरणी आपल्याला मूळचा जळगावकर असणार्‍या तेजस मोरे याने फसवून घड्याळाच्या माध्यमातून स्टींग ऑपरेशन केल्याचे आरोप केला होता. तर मोरे याने हे आरोप फेटाळून लावत चव्हाण यांच्यावरच प्रत्यारोप केले होते.

दरम्यान, आज गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी विधानसभेत या प्रकरणाची सीआयडी चौकशी करण्यात येईल असे जाहीर करतांनाच प्रवीण चव्हाण यांनी सरकारी वकीलपदाचा राजीनामा दिल्याची माहिती दिली. अर्थात, पेन ड्राईव्ह प्रकरणाने चव्हाण यांची विकेट घेतल्याचे आता स्पष्ट झाले आहे. प्रवीण चव्हाण यांनी जळगाव येथील बहुचर्चीत घरकूल घोटाळ्यातील तब्बल ४८ आजी-माजी लोकप्रतिनिधींना शिक्षा ठोठावण्यात मोलाची भूमिका पार पाडली होती.

यानंतर त्यांच्याकडे बीएचआर गैरव्यवहार प्रकरणाचा तपास देखील देण्यात आला होता. आता चव्हाण यांनी सरकारी वकीलपदाचा राजीनामा दिल्यामुळे बीएचआर गैरव्यवहार प्रकरणातून देखील ते बाहेर पडले आहेत. परिणामी आता या प्रकरणी दुसर्‍या सरकारी वकिलांची नियुक्ती होणार असल्याची बाब स्पष्ट झाली आहे. या प्रकरणातील प्रमुख सूत्रधार जितेंद्र कंडारे, सुनील झंवर यांच्यासह अन्य बहुतांश संशयितांना जामीन मिळालेला आहे. आता प्रवीण चव्हाण हे या प्रकरणातून बाहेर पडल्यामुळे या खटल्याचे पुढे काय होणार ? याबाबत चर्चेला उधाण आले आहे. या प्रकरणी आता सरकारी वकील म्हणून कुणाची नियुक्ती होणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Protected Content