प्रकाश आंबेडकरांनी रावेर मधून घोषित केला आपला उमेदवार

जळगाव (प्रतिनिधी) मराठा समाजाने आरक्षणासाठी अनेक मोर्चा काढले, तरीसुध्दा त्यांचा एकही मराठा नेता असे म्हणत नाही की, 16 टक्के व 27 टक्के आरक्षण वेगळे आहेत. त्यामुळे ओबीसीच्या मनात शंका निर्माण झाली आहे. ज्याची काठी त्याची म्हैस त्यामुळेच ओबीसीने स्वतंत्र लढा सुरू केला आहे. 27 टक्के अ व 16 टक्के ब असे म्हणण्याची हिम्मत सध्याच्या सरकारमध्ये नाही. त्यांना झुंज लावण्यात रस असतो. कधी याची तर त्याची बाजु घेवून आपली सत्ता ते कायम ठेवतात, असे प्रतिपादन मुक्ताईनगर येथे झालेल्या वंचित बहुजन आघाडीच्या सभेत अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केले. यावेळी सर्वप्रथम त्यांनी रावेर लोकसभेचे उमेदवार म्हणुन नितीन कांडेलकर यांची उमेदवारी त्यांनी जाहीर केली.

आंबेडकर पुढे म्हणाले की, गेल्या अनेक वर्षात सत्ताधार्‍यांनी स्वत:चे वर्चस्वासाठी आदिवासींवर अन्याय केला आहे. घटनेत तरतुद नसतांही झोन निर्माण केले. त्यात आतील व झोन बाहेरील असे करित आहेत. झोन ही संकल्पना 1976 साली संपली तरी झोन कायम आहेत. आदिवासी विद्यार्थ्यांना बँकेत पैसे मिळू लागले, मात्र त्यांना पैश्यांचा हिशोब कधी जमलाच नाही. त्यामुळे व्यसनाधिनता वाढेल, निवडुण दिलेले त्यांच्यामागे कधीच उभे राहत नाहीत, म्हणून मी सुध्दा जाणीवपुर्वक उभा रहिलो नाही.

आमचे सरकार आल्यास आज ज्या मुलांना बँकेत स्कॉलरशिप मिळत आहे, त्यांना चांगल्या सुविधा हॉस्टेलमध्येच मिळतील. त्यांची स्कॉलरशिपही दुप्पट केली जाईल. त्याचबरोबर जी स्कॉलरशिप एस.सी. एस. टी.ला मिळेल, तीच स्कॉलरशिप ओबीसी विद्यार्थ्याला सुध्दा मिळेल. सत्ता ही श्रीमंतांसाठी नाही तर लोककल्याणासाठी पाहिजे, असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला. आम्ही सत्तेत आल्यास कोणीच वंचित राहणार नाही, असा विश्वास अॅड. आंबेडकर यांनी यावेळी व्यक्त केला.

Add Comment

Protected Content