गाढवाचं लग्न या नाटकात गंगीची भूमिका करणाऱ्या प्रभा शिवणेकर यांचे निधन


पुणे-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | लोककलावंत प्रभा शिवणेकर यांचे निधन झाले आहे. वयाच्या 81 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. ‘गाढवाचं लग्न’ या वगनाट्यात त्यांनी गंगीची भूमिका साकारली होती. पिंपरी येथील एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. या उपचारादरम्यानच त्यांची प्राणज्योत मालवली.

‘गाढवाचे लग्न’ या वगनाट्यात त्यांनी गंगीची भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका चांगलीच लोकप्रिय झाली होती. या नाटकाला भारतीय केंद्रशासनाचा राष्ट्रपती पुरस्कार मिळाला होता. त्या अविवाहित होत्या. त्या आपल्या बहीण व भावांबरोबर राहायच्या. त्यांच्या भावंडांनीच त्यांचा शेवटपर्यंत सांभाळ केला. त्यांच्या निधनाने लोककलेतील एक तारा निखळला असल्याची भावना व्यक्त होत आहे.

प्रभा शिवणेकर यांनी वगसम्राट दादू इंदुरीकर, अभिनय सम्राट शंकरराव शिवणेकर, शाहीर अमर शेख, विठाबाई नारायणगावकर, रघुवीर खेडकर, कांताबाई सातारकर, तुकाराम खेडकर आणि चंद्रकांत ढवळपुरीकर यांच्याबरोबर साकार केलेल्या भूमिका अजरामर झाल्या. आपल्या कारकिर्दीत 100 हून अधिक भूमिका साकारणाऱ्या प्रभा शिवणेकर नाटकांच्या प्रयोगानिमित्त राज्यभर फिरायच्या. संगीत नाट्य अकादमीने प्रभा शिवणेकर यांना 1974 मध्ये तत्कालीन राष्ट्रपतीच्या हस्ते राष्ट्रीय पुरस्कार देऊन सन्मानित केले. तर राज्य शासनाने विठाबाई नारायणगावकर पुरस्कार देऊन गौरव केला होता. ज्येष्ठ साहित्यिक प्रभाकर ओव्हाळ यांनी ‘एका गंगीची कहाणी’ हे प्रभा शिवणेकर यांचे जीवनपट उलगडून दाखवणाऱ्या चरित्रग्रंथाचे लेखन केले आहे.