धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूजह प्रतिनिधी । भारतीय स्वातंत्र्याला ७९ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने देशभर विविध उपक्रम राबवले जात असताना, क्रीडा क्षेत्रात एका भारतीय सुपुत्राने जागतिक विक्रम प्रस्थापित केला आहे. भारतातील स्केटिंग कोचेसच्या वतीने आयोजित ‘स्केटिंग मॅरेथॉन’मध्ये पौरव सुरजकुमार महाजन याने सलग ७९ मिनिटे नॉन-स्टॉप स्केटिंग करून जागतिक विक्रमाला गवसणी घातली आहे. पुणे येथे पार पडलेल्या या स्पर्धेच्या अंतिम फेरीत त्याने प्रथम क्रमांक पटकावून सुवर्णमयी कामगिरी केली.
२२ शहरांतून ५७९ विद्यार्थ्यांचा सहभाग
ही ऐतिहासिक मॅरेथॉन १५ ऑगस्टपासून देशातील २२ वेगवेगळ्या शहरांमध्ये टप्प्याटप्प्याने सुरू होती. या महामुकाबल्यात देशभरातून एकूण ५७९ विद्यार्थी सहभागी झाले होते. या सर्वांवर मात करत पौरवने ७९ व्या स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून ७९ मिनिटे अविरत स्केटिंग करण्याचे कठीण आव्हान यशस्वीरीत्या पूर्ण केले आणि वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आपले नाव नोंदवले.

दिग्गजांच्या उपस्थितीत कौतुकाचा वर्षाव
पौरवच्या या दैदिप्यमान यशामुळे त्याचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे. क्रांतिकारी खाजाजी नाईक स्मृती संस्थेच्या वतीने पौरवचा विशेष गौरव करण्यात आला. याप्रसंगी बाळासाहेब चौधरी, नारायण रामदास चौधरी, पी. सी. पाटील, सुभाष अण्णा पाटील, अमोल जाधव, विलास महाजन, किशोर चौधरी, समाधान मोरे, चिंतामण पाटील, दिनेश पाटील, कन्हैया रायपूरकर, दिलीप महाजन, हिरालाल बडगुजर, योगेश बडगुजर, वाय. बी. पाटील, सुखदेव सोनवणे यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. पौरवने मिळवलेले हे यश केवळ त्याच्या कष्टाचे फळ नसून, आगामी काळातील तरुण खेळाडूंसाठी ती एक मोठी प्रेरणा ठरणार आहे. या विक्रमामुळे जळगाव जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्राची मान क्रीडा जगतात उंचावली आहे.



