भुसावळ प्रतिनिधी । वैद्यकीय अधिकारी नसल्याने येथील श्री.संत गाडगे महाराज नगरपालिका रुग्णालयात तब्बल १२ वर्षांपासून शवविच्छेदनाची सुविधा नव्हती. आता मात्र पुन्हा पोस्टमार्टमची सुविधा मिळणार असल्याने नागरिकांना होणारा त्रास टळणार आहे.
भुसावळ नगरपालिकेच्या श्री संत गाडगेबाबा रूग्णालमध्ये गेल्या बारा वर्षांपासून शवविच्छेदन करणे बंद झाले होते. ही सुविधा सुरू करण्यात यावी यासाठी अनेकदा मोर्चे काढण्यात आले नव्हते. तथापि, नगरपालिकेला वैद्यकीय अधिकारी येण्यास तयार नसल्याने याला विलंब झाला होता. खरं तर काही राजकारण्यांनी भुसावळकरांना मुद्दाम त्रास देण्यासाठी हा प्रकार केल्याचे आधीच उघडकीस आले आहे. या पार्श्वभूमिवर, अलीकडेच श्री. संत गाडगे महाराज रुग्णालयात भुसावळात नगरपालिकामध्ये ७ मार्चला डॉ. संदीप इंगळे यांची वैद्यकीय अधिकारी वर्ग-दोन या पदासाठी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी पदभारदेखील स्वीकारला आहे. यातच कालच आरोग्य सभापती यांनी शवविच्छेदन रूमची पाहणी केली. बारा वर्षांपासून बंद असल्यामुळे पोस्टमार्टम रूमची दयनीय अवस्था झाली आहे. तेथे पाण्याची व्यवस्था नसून पाईपची तोडफोड करण्यात आली आहे. शवविच्छेदनाचे साहित्यही गायब करून त्याची विल्हेवाट लावण्यात आली आहे. यामुळे या सर्व बाबींना लक्षात घेत पोस्टमार्टम रूमचे नूतनीकरण करून येथे शवविच्छेदनाची सुविधा देण्यात येणार आहे.
शवविच्छेदन सुरू करण्यासाठी आस्थापना प्रमुख पाठक, मुख्याधिकारी रोहिदास दोरकुळकर, डॉ.कीर्ती फलटणकर, ठाकूर बाबूजी, डॉ. संदीप इंगळे व संबंधित कर्मचारी यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली. यानंतर शवविच्छेदनासाठी तीन कर्मचार्यांना सिव्हिल हॉस्पिटल मध्ये ट्रेंनिग देण्यासाठी पाठविण्यात आले आहे. यामुळे लवकरच भुसावळात पुन्हा एकदा पोस्टमार्टमची सुविधा मिळणार असून शहरासह परिसरातील नागरिकांना जळगावला जाण्याचा फेरा वाचणार आहे. यासोबत वैद्यकीय अधिकारी रूजू झाल्यामुळे पोलीस कर्मचार्यांना आरोपींच्या तपासणीसाठी जळगाव, वरणगाव व यावल येथे जाणे थांबले आहे. यामुळे पोलीस प्रसासनालाही याचा फायदा होणार आहे.
पहा : भुसावळ येथील शवविच्छेदनाच्या सुविधेबाबतचा हा व्हिडीओ.