कुऱ्हा येथील सरकारी दवाखान्याची दुरवस्था; रुग्णांचा जीव धोक्यात!


मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । मुक्ताईनगर तालुक्यातील कुऱ्हा येथील सरकारी दवाखान्याची इमारत गेल्या अनेक वर्षांपासून दुरवस्थेत असून, रुग्णांचा जीव धोक्यात आला आहे. पावसाळ्याच्या दिवसांत तर या दवाखान्यात पाण्याची गळती होते आणि छताचे काही भाग कोसळत आहेत, अशी भीतीदायक परिस्थिती आहे.

दवाखान्यातील कर्मचाऱ्यांनी या गंभीर समस्येबाबत वारंवार तक्रारी करूनही संबंधित विभागाने याकडे पूर्णतः दुर्लक्ष केले आहे. जीर्ण झालेल्या इमारतीमुळे रुग्णांसह कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पावसाळ्यात पाण्याची गळती होऊन छत कोसळण्याच्या घटना घडत असल्याने कोणतीही मोठी हानी होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

या पार्श्वभूमीवर, स्थानिक नागरिकांनी आरोग्य विभागाने तातडीने याकडे लक्ष देऊन दवाखान्याची दुरुस्ती करावी किंवा पर्यायी व्यवस्था करावी, अशी मागणी केली आहे. तसेच, या भागाचे आमदार आणि खासदार या गंभीर समस्येकडे लक्ष देतील का, असा प्रश्नही नागरिक विचारत आहेत. या दवाखान्याच्या दुरवस्थेमुळे परिसरातील रुग्णांना उपचारासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. आरोग्य विभागाने यावर त्वरित उपाययोजना न केल्यास भविष्यात मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.