कर्नाटकात कुमारस्वामींचे भाजपला सत्ता स्थापनेचे निमंत्रण

बंगळुरू वृत्तसंस्था । विश्‍वासदर्शक ठरावावर मतदान होण्याआधीच मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी भाजपला सत्ता स्थापनेसाठी निमंत्रण देऊन आपली हार स्वीकारल्याचे संकेत दिले आहेत.

आज सकाळी कर्नाटकातील राजकीय पेचावर राज्यपाल वजूभाई वाला यांनी मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांना पत्र लिहून दुपारी दीड वाजेपर्यंत बहुमत सिध्द करण्याचे निर्देश दिले होते. यानुसार दुपारी विश्‍वासदर्शक प्रस्तावावर कुमारस्वामी यांनी भाषण केले. ते म्हणाले की, कर्नाटकातील सरकार पाडण्यासाठी भाजपने सर्व तर्‍हेचे प्रयत्न केले असून आमदारांना मोठ्या प्रमाणात आमीष देण्यात आले आहे. हा सत्तेचा गैरवापर असल्याचा आरोप कुमारस्वामी यांनी केला. भाजपला सत्ता स्थापन करायची असल्यास आपली हरकत नसल्याचे ते म्हणाले. या माध्यमातून त्यांनी एक प्रकारे आपली हार स्वीकारली असल्याचे मानले जात आहे.

दरम्यान, कर्नाटक विधानसभेत विश्‍वासदर्शक प्रस्तावावरील चर्चा सुरू आहे. यात विविध नेते भाषण करणार असल्यामुळे आज मतदान होते की नाही ? याबाबत संभ्रमाचे वातावरण आहे. तथापि, या आधीच कुमारस्वामी यांच्या वक्तव्यामुळे त्यांचे सरकार पायउतार होणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळाल्याचे दिसून येत आहे.

Protected Content