‘एमसीएमसी’च्या प्रमाणपत्राशिवाय राजकीय जाहिरात प्रसारित करता येणार नाही

 

social media political campaign

मुंबई (वृत्तसंस्था) निवडणुकांच्या काळात समाजमाध्यमांवर अंकुश ठेवण्यासाठी नियमावली बनवण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. राष्ट्रीय निवडणूक आयोगाने याबाबतची माहीती मुंबई उच्च न्यायालयात दिली आहे. त्यानुसार कोणतीही राजकीय जाहिरात ‘मीडिया सर्टिफिकेशन अँड मॉनिटरींग कमिटी’च्या (एमसीएमसी) प्रमाणपत्राशिवाय प्रसारीत करता येणार नाही. एवढेच नव्हे तर, सध्या प्रसारित झालेल्या जाहिरातींनादेखील हे प्रमाणपत्र आवश्यक असेल.

 

आगामी निवडणुकांचा काळ लक्षात घेता आचारसंहितेच्या काळात मतदानाच्या ४८ तास आधी सर्व समाजमाध्यमांसाठी नियम अधिक काटेकोरपणे राबवले जातील. तसेच मुंबई उच्च न्यायालयात यासंदर्भात याचिकाकर्ते, गुगल, फेसबुक, ट्विटर, युट्यूब यांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रांचाही विचार केला जाईल, अशी लेखी हमी राष्ट्रीय निवडणूक आयोगाच्या वतीने हायकोर्टात देण्यात आली आहे. या माहिती नुसार मीडिया सर्टिफिकेशन अँड मॉनिटरींग कमिटीच्या प्रमाणपत्राशिवाय प्रसारीत झालेल्या जाहिराती तात्काळ हटवण्याचे आदेश समाजमाध्यमांना देण्यात येतील. प्रमाणपत्र नसलेल्या जाहिरातींबाबत राष्ट्रीय निवडणूक आयोगाला कळवणे समाजमाध्यमांना बंधनकारक राहणार आहे. राष्ट्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशांनंतर कोणताही आक्षेपार्ह मजकूर, पोस्ट, जाहिरात, फोटो तात्काळ हटवणे समाजमाध्यमांना बंधनकारक राहील. येत्या सोमवारी मुंबई उच्च न्यायालय यासंदर्भात आपले निर्देश देणार आहे.

Add Comment

Protected Content