पाचोरा, लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | राज्यातील निवडक क्रीडा संघटनांची महाराष्ट्रात पहिल्यांदाच विविध प्रश्नासंदर्भात ‘ऑलिंपिक कार्यालय’ पुणे येथे बैठक संपन्न झाली.यावेळी ‘शारीरिक शिक्षण विषय व शिक्षक यांच्या उन्नतीसाठी धोरण आखणार असल्या’चे भारतीय ऑलिंपिकचे सहसचिव नामदेवराव शिरगावकर यांनी केले.
महाराष्ट्र ऑलिंम्पिक असोसिएशन, शारीरिक शिक्षण शिक्षक संघटना व राज्यातील निवडक क्रीडा संघटनांची महाराष्ट्रात पहिल्यांदाच शारीरिक शिक्षण शिक्षक आणि क्रीडा विषयक समस्या, नोकर भरती या बाबत चर्चा करणेसाठी व प्रश्नांची सोडवणूकीसाठी संघटित व योग्य मार्गाने प्रयत्न व्हावेत म्हणून महाराष्ट्र ऑलिंम्पिक असोसिएशनचे महासचिव तथा भारतीय ऑलिंपिकचे सहसचिव नामदेवराव शिरगावकर यांच्या संकल्पनेतून व पुढाकाराने ऑलिंपिक कार्यालय, पुणे येथे बैठक संपन्न झाली. या बैठकीत शारीरिक शिक्षक व क्रीडा संघटनांचे निमंत्रित सदस्य उपस्थित होते.
या बैठकीत मुंबई विद्यापीठातील शारीरिक शिक्षण संचालक पद निर्मिती, माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागात शारीरिक शिक्षण शिक्षक भरती व विविध प्रश्नासंदर्भात संघटना प्रतिनिधींशी संवाद साधत शिरगावकर यांनी मार्गदर्शन केले. महाराष्ट्र ऑलिंम्पिकच्या वतीने घेण्यात येणाऱ्या मिनी ऑलिंपिक स्पर्धा आयोजन व नियोजनामध्ये क्रीडा संघटकांबरोबर शारीरिक शिक्षकांना बरोबर घेतले जाईल. तसेच प्रत्येक खेळ शारीरिक शिक्षकांच्या आणि क्रीडा संघटना माध्यमातून गावपातळीवर पोहचविण्याचा ऑलिंम्पिक असोसिएशन प्रयत्न करणार आहे. शारीरिक शिक्षण व क्रीडा विषयातील होणारे नवनवीन बदल शिक्षकांपर्यंत पोहचविण्यासाठी ऑलिंम्पिक असोसिएशन शासनाचे सहकार्याने मदत करणार असल्याचे शिरगावकर यांनी सांगितले. यावेळी संघटना प्रतिनिधीं समवेत ऑलिंम्पिक असोशिएशनचे सहसचिव श्री दयानंद, कार्यकारी अधिकारी राजेंद्र घुले उपस्थित होते. सभेच्या नियोजनात शिवाजी साळुंके यांनी महत्वाची भूमिका बजावली.
या सभेसाठी महाराष्ट्र शारीरिक शिक्षक समन्वय समितीचे अध्यक्ष विश्वनाथ पाटोळे (पुणे), महाराष्ट्र राज्य युवा शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाचे अध्यक्ष संदिप मनोरे (जळगांव), महासचिव तायाप्पा शेंडगे (सातारा), क्रिडा शिक्षक महासंघाचे अध्यक्ष राजेंद्र कोतकर (अहमदनगर), मच्छिंद्र ओव्हळ, शारीरिक शिक्षण महामंडळ अमरावती सहसचिव शिवदत्त ढवळे (अमरावती), राज्य क्रीडा विकास परिषद सचिव ज्ञानेश काळे (सातारा), राज्य क्रीडा संघर्ष समितीचे अविनाश ओंबासे (कल्याण), मनोज माळी, अनिल एटम, महाराष्ट्र शालेय खेळ बचाव समितीचे शाम भोसले, शिवाजी साळुंके (पुणे), क्रीडा विकास परिषदेचे अशोक सरोदे, पुरुषोत्तम जगताप, मुंबई महानगर पालिका युनीटचे डॉ. जितेंद्र लिंबकर (मुंबई), पँथर स्पोर्ट्सचे संजय कांबळे, युवा महासंघचे समन्वय गणेश जोरावर (सोलापूर), लखन मोरे (पुणे) आदी. उपस्थित होते.