जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । ऋषी पंचमीनिमित्त जळगाव तालुक्यातील कानळदा येथील गिरणा नदी पात्रात पुजेचे पैसे उचलण्यासाठी गेलेल्या एका अकरा वर्षीय मुलगा नदी काठावरून नदीत पडला. हे पाहून तिथे उपस्थित असलेल्या महिला पोलीस कर्मचारी यांनी क्षणाचाही विचार न करत थेट नदीत उडी घेवून त्याला वाचविण्यात यश आले आहे. ही घटना रविवारी ८ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास घडली आहे. मुलाला वाचविल्याने कानळदा ग्रामपंचायतीच्या वतीने महिला पोलीस कर्मचाऱ्याचा जाहीर सत्कार करण्यात आला.
याबाबत अधिक असे की, जळगाव तालुक्यातील कानळदा येथील गिरणा नदीच्या तीरावर असलेल्या महर्षी कणवाश्रमात ऋषिपंचमी निमित्त दरवर्षी महिला भाविकांची हजारोच्या संख्येने गर्दी असते. कानळदा गावाचे सरपंच पुंडलिक सपकाळे यांनी पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांची भेट घेऊन पूर्व कल्पना देऊन विशेष बंदोबस्तची विनंती केली होती. त्यासाठी महिला पोलीस कॉन्स्टेबल यांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
या अनुषंगाने रविवारी ८ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता गिरणी नदी काठावर अनेक महिला आंघोळ करण्यासाठी आलेल्या आसतांना अकरा वर्षीय मुलगा हा पुजेतील पैसे घेण्यासाठी आलेला होता. त्यावेळी पैसे उचलत असतांना त्याचा पाय घसरला आणि नदीच्या पाण्यात पडला. त्यावेळी या ठिकाण बंदोबस्तासाठी आलेल्या महिला पोलीस कर्मचारी पौर्णिमा चौधरी यांना हा मुलगा पाण्यात पडल्याचे दिसून आले. त्यांनी जीवाची पर्वा न करता वर्दीसहीत पाण्यात उडी घेतली व मुलाला पाण्याबाहेर काढले. या महिला कर्मचाऱ्याच्या धाडसाचे उपस्थित महिला भाविक, महर्षी कणवाश्रमाचे विश्वस्त तसेच सरपंच व सदस्यांमार्फत परिसरात सर्वत्र कौतुक होत आहे. यावेळी ग्रामस्थांच्या वतीने सरपंच पुंडलिक सपकाळे यांनी त्यांचा सत्कार करून गौरव केला.