राज्यात लवकरच होणार पोलीस भरती – गृहमंत्र्यांची माहिती

police bandobast

 

अमरावती प्रतिनिधी । महाविकास आघाडीच्या गृहविभागाने सध्या मेगा भरती करण्याचा निर्णय घेतला असून या अंतर्गत पोलीस दलातील रिक्त पदे भरण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे. आज अमरावती जिल्यातील दर्यापूर येथील एका कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते.

दिवंगत जे.डी. पाटील उपाख्य बाबासाहेब सांगळूदकर यांच्या ५१व्या पुण्यतिथीनिमित्त दर्यापूर येथील श्रीमती कोकिळाबाई गावंडे महिला महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमात गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले की, देशभरात बेरोजगारीच्या प्रश्नाने उग्र रुप धारण केलेले असताना, रोजगाराबाबत राज्य सरकारने दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. या निर्णयांतर्गत गृहविभाग लवकरच सात ते आठ हजार पदांवर पोलीस भरती करणार असल्याची माहिती त्यांनी दिली. पोलीस भरतीसह विविध स्पर्धा परिक्षांसाठी ग्रामीण भागातील तरुणांनी अभ्यासात सातत्य ठेवत तयारी करायला हवी असे मतही त्यांनी व्यक्त केले. राज्यातील महिला अत्याचाराला आळा घालण्यासाठी शासन पावले उचलणार आहे. विद्यार्थ्यांच्या वाढत्या आत्महत्येबाबत गृहमंत्री देशमुख यांनी चिंता व्यक्त केली. पालकांनी आपल्या मुलांवर अवास्तव अपेक्षांचे ओझे लादू नये, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी कार्यक्रमाला विधानसभेचे माजी उपाध्यक्ष शरद तसरे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. आमदार बळवंत वानखडे, जिल्हा परिषद सभापती जयंतराव देशमुख, माजी मंत्री रणजीत देशमुख, माजी आमदार अमर काळे, सुनील वऱ्हाडे, आनंद माने आदी यावेळी उपस्थित होते.

Protected Content