जळगाव (प्रतिनिधी) शहरातील शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक के. डी. पाडळे यांची नुकतेच नाशिक ग्रामीण विभागात बदली झाली. शहर पोलीस ठाण्यातील अधिकारी, कर्मचारी वर्गाने त्यांना आगळ्यावेगळ्या पद्धतीने निरोप दिला. शहर पोलीस ठाण्यातून त्यांची घोड्यावरून मिरवणूक काढण्यात आली.
एखादा पोलीस अधिकारी एखाद्या पोलीस ठाण्यात हजर झाल्यानंतर त्याचे त्याठिकाणी असलेल्या कर्मचाऱ्यांशी ऋणानुबंध जुळतात. शहर पोलीस ठाण्यात अवघ्या आठ महिन्यांपूर्वी पोलीस निरीक्षक म्हणून पाडळे हे रुजू झाले होते. कमी वेळात त्यांनी सर्वांवर आपली चांगली छाप पाडली. नुकतेच त्यांची नाशिक ग्रामीण परिक्षेत्रात बदली झाली. पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून त्यांना निरोप देण्याचा कार्यक्रम शुक्रवारी आयोजित केला होता. यावेळी पोलीस ठाण्यातील प्रत्येक विभागाकडून पाडळे यांचा पुष्पहार घालून आणि भेटवस्तू देवून सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन पोलीस कर्मचारी मनोज पाटील यांनी केले.
भावूक मनोगत आणि मिरवणूक – शेवटचा क्षण भावनिक असतो. तुमच्या सोबत फार कमी वेळ मिळाला. दोन वर्ष मिळाले असते तर आणखी गट्टी जमली असती. आजपर्यंत कुणाचेही नुकसान होईल, असे वागलो नाही आणि वागणारही नाही. भविष्यात कोणत्याही मदतीसाठी मला केव्हाही संपर्क साधा, मी तयार राहील. प्रत्येकाने नोकरीत सतर्क रहा, कोणतेही काम करताना कुटुंब डोळ्यासमोर ठेवून काळजी घ्या, असा सल्ला निरीक्षक पाडळे यांनी यावेळी दिला. शहर पोलीस ठाण्यात सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी बँड लावून देशभक्तीपर गाणी वाजवली. तसेच पोलीस ठाण्यातून त्यांना घोड्यावर बसवून मिरवणूकही काढली.
पहा- पाडळे यांना दिलेल्या निरोपाचा हा व्हिडीओ.