रावेर लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | चार दिवसांपूर्वी रावेर शहरात उघडकीस आलेल्या २ लाख ३४ हजार रुपये किमतीच्या गुटखा तस्करी प्रकरणात मुख्य सूत्रधाराचा शोध घेण्यासाठी मध्यप्रदेशातील बुऱ्हाणपूर येथे गेलेले रावेर पोलिसांचे पथक रिकाम्या हाती परतले आहे. या प्रकरणी फरार असलेल्या आरोपींचा शोध अजूनही सुरू असल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक मीरा देशमुख यांनी दिली आहे.
रावेर आणि फैजपूर पोलीस पथकांनी गुप्त माहितीच्या आधारे संयुक्त कारवाई करत महाराष्ट्रात बंदी असलेला गुटखा जप्त केला होता, ज्यामुळे शहरात मोठी खळबळ उडाली होती. या प्रकरणी रावेर पोलीस ठाण्यात एकूण चार आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यापैकी एका आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश आले असले, तरी उर्वरित तीन आरोपी अद्याप फरार आहेत.

मुख्य सूत्रधार आणि फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलीस पथक मध्यप्रदेशात गेले होते. मात्र, तिथे त्यांना कोणताही ठोस पुरावा किंवा संशयित व्यक्ती हाती लागली नाही. त्यामुळे तपास पथकाला रिकाम्या हाती माघारी परतावे लागले आहे. पोलिसांनी फरार आरोपींचा कसून शोध सुरू ठेवला असून, लवकरच त्यांना अटक करण्याची शक्यता आहे.



