पोलीसासह माजी सभापतींवर जिवघेणा हल्ला : आंदोलनकर्त्यांवर गुन्हे दाखल

पहूर,ता.जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | आज येथील आंदोलनास हिंसक वळण लागून एक पोलीस तसेच पंचायत समितीच्या माजी सभापतींना ठार मारण्याचा प्रयत्न झाला असून या प्रकरणी सुमारे शंभर ते दीडशे आंदोलकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

पहूर येथे आज आंदोलनास हिंसक वळण लागले. यात वाहनांची तोडफोड करण्यात आली. यामुळे दोन्ही बाजूंनी दोन ते तीन तास वाहतुकीची कोंडी झाली. तसेच या आंदोलनामध्ये काही जणांवर हल्ला देखील करण्यात आला असून या प्रकरणी सायंकाळी फिर्याद दाखल करण्यात आली.

या संदर्भात, पहूर पोलीस स्थानकात पोलीस कर्मचारी गोपाळ माळी यांनी फिर्याद दिली. यात म्हटले आहे की, ते आंदोलनाचे व्हिडीओ चित्रीकरण करीत असतांना मारहाण करून मोबाईल फोडला असे फिर्यादीत म्हटले आहे. गोपाळ माळी यांच्या फिर्यादीवरून आंदोलन कर्ते चेतन करतार जाधव ( ३८) यांच्या सह शंभर ते दीडशे आंदोलकांवर शासकीय कामात अडथळा, जिवे ठार मारण्याचा प्रयत्न,दंगल,मारहाण, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान असा स्वरुपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तर पंचायत समितीचे माजी सभापती बाबुराव घोंगडे यांनी देखील फिर्याद दाखल करून आपल्यावर हल्ला चढवण्यात आल्याचे नमूद केले आहे. या प्रकरणात आत्माराम जाधव (५५), विजय राठोड (४०) अमरसिंग राठोड(४५) यांच्या सह दहा ते पंधरा आंदोलन कर्त्यांवर जिवे ठार मारणे,गाडीचे नुकसान, दंगल व मारहाण असा स्वरुपाचा दुसरा ही गुन्हा दाखल केला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

Protected Content