पिकांच्या नुकसानी संदर्भात यावल येथे शेतकऱ्यांसह पोलीस प्रशासनाची बैठक

यावल – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून पिकांचे नुकसान करणे, साहित्याची चोरी यावर आळा घालण्यासंदर्भात मंगळवारी १५ मार्च रोजी यावल कृषि उत्पन्न बाजार समितीच्या आवारात शेतकरी व पोलीस प्रशासनाच्या वतीने संयुक्त बैठक घेण्यात आली.

 

या बैठकीत शेतकऱ्यांच्या संतप्त प्रतिक्रिया उमलल्या. याप्रसंगी उपविभागीय पोलिस उपअधीक्षक डॉ. कुणाल सोनवणे पोलीस निरिक्षक सुधीर पाटील उपस्थित होते. याबाबत अधिक माहिती अशी की, यावल तालुक्यात गेल्या अनेक दिवसांपासून शेतकऱ्यांच्या हाताशी आलेल्या पिकांची नासाडी करणे, उभे पिक कापून नेणे, पीक कापून अथवा आग लावून जाळून टाकणे, शेतात गुरे चारणे, विद्युत पंप, विद्युत केबल्स चोरी या त्रासामुळे शेतकरी त्रस्त झाला आहे. दोन दिवसापूर्वी  येथील किशोर राणे यांचे शेतात बकऱ्या चराईस मनाई केल्यावरुन राणे यांना बेदम मारहाण करत दुसरे दिवशी सुमारे ६ लाखाचे २ हजार केळीचे घड कापून नुकसान केले. तसेच तालुक्यातील चितोडा येथील दिनेश कुरकुरे यांच्या शेतातील हरभऱ्याच्या पेटवून देवून 50 हजार रुपयांचे नुकसान केले. या घटनेमुळे यावल तालुक्यातील शेतकरी संतप्त झाले होते शेतकऱ्याच्या उभ्या पिकासह शेतीतील शेती साहित्याच्या चोऱ्या तसेच रात्रभर मोकाट गुरे शेतात चराईस सोडले जात असल्याने चहु बाजूने  शेतक-यांची  कोंडी करत नुकसान केले जात असल्याच्या संतप्त प्रतिक्रिया बैठकीत व्यक्त करण्यात आल्या. दरम्यान, मोकाट गुरे मालक तसेच शेत पिकाचे नुकसान करणारे व शेत साहित्याची चोरी करणारे आढळून आल्यास त्यांचेवर कडक स्वरुपाची कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे आश्वासन पोलीस निरीक्षक सुधीर पाटील यांनी शेतकऱ्यांना दिले.

 

बैठकीत डॉ. कुंदन फेगडे, भाजपा किसान मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष नारायण चौधरी , डॉ. निलेश गडे, धिरज महाजन, हेमराज फेगडे, किशोर राणे, प्रमोद नेमाडे, कृष्णाजी पाटील, डीगंबर सावकारे, अट्रावलचे राजेन्द्र महाजन यांनी व्यथा मांडल्या. बैठकीस शहरासह परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

Protected Content