पेट्रोलियन कंपन्यांना दिलासा : कच्च्या तेलाचे घसरले दर

नवी दिल्ली – लाईव्ह ट्रेंडस न्युज वृत्तसेवा । रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू झाल्यापासून कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. सलग दोन आठवडे कच्च्या तेलाचे दर प्रति बॅरल 100 डॉलरच्या वर होते. मात्र, चालू आठवड्यात कच्च्या तेलाच्या किमतीत घसरण झाली आहे. कच्च्या तेलाचे दर प्रति बॅरल 100 डॉलरच्या खाली गेले आहेत. दरम्यान, कच्च्या तेलाच्या किमती घसरल्याने भारतीय तेल कंपन्यांना दिलासा मिळाला आहे.

गेल्या 15 दिवसांमध्ये सातत्याने कच्च्या तेलाचे दर वाढत होते. कच्च्या तेलाचे वाढते दर पहाता दहा मार्चला पाच राज्यातील निवडणुकांचा निकाल लागल्यानंतर देशात पेट्रोल, डिझेलचे दर वाढवले जातील असा अंदाज होता. मात्र निवडणूक निकालानंतर देखील पेट्रोल, डिझेलचे दर स्थिर ठेवण्यात आले. इंधनाचे दर स्थिर ठेवण्यात आल्याने पेट्रोलियम कंपन्यावरील दबाव वाढला होता. मात्र आता कच्च्या तेलाचे दर काहीप्रमाणात कमी झाल्याने त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. भारतात गेल्या चार नोव्हेंबरपासून पेट्रोल, डिझेलच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेले नाही.

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती झपाट्याने कमी होताना दिसत आहेत. गेल्या आठ दिवसांमध्ये कच्च्या तेलाच्या भावात प्रति बॅरल मागे 40 डॉलरची घट झाली आहे. सात मार्चला क्रूड ऑईलचे दर 139 डॉलर प्रति बॅरल होते. तर चालू आठवड्यात ते 99 डॉलर प्रति बॅरलच्याही खाली आले आहेत. याचाच अर्थ कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये सरासरी चाळीस डॉलरची घट झाली आहे. कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये घट होने ही भारतासाठी दिलासादायक गोष्ट आहे. कारण भारत हा कच्च्या तेलाचा जगातील एक मोठा आयातदार देश आहे.

Protected Content