मुंबई सेंट्रल स्थानकावर उभारणार ‘पॉड हॉटेल’

mumbai central

मुंबई प्रतिनिधी । मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकावर अतिशय आटोपशीर आकाराचे आणि स्वस्त दर असणारे पॉड हॉटेल उभारण्यात येत असून यामुळे प्रवाशांची उत्तम सोय होणार आहे.

प्रत्येक रेल्वे स्थानकावर प्रवाशांसाठी वेटींग रूम्स आहेत. तथापि, काही प्रवाशांना बराच वेळ थांबावे लागते. यामुळे त्यांना महागड्या हॉटेल्स वा लॉजमध्ये थांबण्याशिवाय कोणताही पर्याय सध्या उपलब्ध नाही. नेमकी हीच बाब लक्षात घेत इंडियन रेल्वे कॅटरींग अँड ट्रॅव्हल कार्पोरेशन म्हणजेच आयआरसीटीसीने पॉड हॉटेलच्या माध्यमातून प्रवाशांना स्वस्त पर्याय उपलब्ध करून देण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. या अनुषंगाने मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकावर देशातील पहिले पॉड हॉटेल उभारण्यात येत आहे. अंदाजे चार हजार चौरस फुटांच्या जागेवर या पॉड हॉटेलची उभारणी करण्यात येणार आहे. यामध्ये वाय-फाय, यूएसबी पोर्ट, टीव्ही, वातानुकूलित रूम, विद्युत दिवे (याचा प्रकाश कमी-जास्त करण्याची व्यवस्था) असणार आहे. हवेशीर जागा, डिझाइन असलेल्या नक्षी, सरकते दरवाजे, स्मोक डिटेक्टर अशा सुविधा प्रवाशांना मिळणार आहे. या रूममध्ये अनेक जीवनावश्यक गरजेसह आधुनिक तंत्रज्ञानाच्या सुविधा मिळणार आहेत. प्रवाशांना कमाल १२ तासांची विश्रांती करता येणार आहे. आयआरसीटीसीकडून अशा २५ पॉड (रूम)ची उभारणी करण्यात येणार आहे. आगामी मार्च महिन्यापर्यंत हे हॉटेल प्रवाशांसाठी खुले करण्यात येणार आहे.

पॉड हॉटेलची संकल्पना पहिल्यांदा जपानमध्ये राबविण्यात आली असून याचे अनुकरण अनेक देशांमध्ये करण्यात आलेले आहे. याआधी मुंबईतल्या अंधेरी येथे २०१७ साली अर्बनपॉड या खासगी पॉड हॉटेलची निर्मिती करण्यात आली आहे. यानंतर आता रेल्वेने या प्रकारचे हॉटेल उभारण्याची तयारी केल्याचे दिसून येत आहे.

Protected Content