सैन्यदलातील शहीद वीर माता, पिता, विरपत्नी यांना मे पूर्वी भूखंड वाटप करणार : जिल्हाधिकारी

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | जिल्ह्यातील माजी सैनिकांचे प्रश्न निकाली काढण्यासाठी विशेष लोकशाही दिन आयोजित केला होता. त्यातील एक महत्वाचा विषय 11 शहीद वीर माता, पिता, विरपत्नी यांना भूखंड वाटप करावयाचा आहे. पण जमिनीची उपलब्धता नसल्यामुळे हा विषय प्रलंबित राहिला असून येत्या काही महिन्यात भूखंड मिळवून देण्यात येईल अशी ग्वाही जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली.

जिल्हा अल्प बचत भवन मध्ये आयोजित करण्यात आलेल्या जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाच्या ध्वज निधी संकलन कार्यक्रम- 2024 मध्ये बोलत होते. यावेळी प्रशिक्षणार्थी आय ए एस अधिकारी वेवोतोलू केजो, निवासी उपजिल्हाधिकारी भिमराव दराडे, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी निलेश पाटील, सहायक सैनिक कल्याण अधिकारी संजय गायकवाड, माजी सैनिक ईश्वर मोरे उपस्थित होते.

जळगाव तालुक्यातील सावखेडा येथे 2 हेक्टर भूखंड डिफेन्स कॉलनीसाठी देण्यात येणार असून त्याची कार्यवाही सुरु असून यासाठी पात्र सैनिकांना इथे घर मिळेल. जवळपास दोनशे सैनिकांना इथे जागा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी यावेळी दिली. पाचोरा आणि भडगाव येथील खुप जवान देशसेवेत आहेत, त्यांच्यासाठी पण काही करता येईल यासाठी प्रयत्न करू असेही जिल्हाधिकारी यांनी सांगितले. याबरोबरच डिफेन्स स्कुल काढण्याची गरज असून त्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून जे सहकार्य शक्य आहे ते दिले जाईल असे सांगून माजी सैनिकांनी एकत्र येऊन नोकरी करण्यापेक्षा त्यांना मिळणाऱ्या भूखंडावर प्रक्रिया उद्योग सुरु करावेत जिल्हा प्रशासन त्यासाठी मदतीला असेल अशी ग्वाही जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी यावेळी दिली.

सैनिक कल्याणासाठी जो ध्वज निधी संकलन केलं जातं ते प्रत्येकवर्षी जिल्ह्यात उद्दिष्टापेक्षा अधिक होतं. 2023 साठी 1 कोटी 18 लाख होते. संकलन झालेली रक्कम 1 कोटी 23 लाख आहे. या रक्कमेपेक्षा किती तरी अधिक रक्कम पुढच्या उद्दिष्टासाठी देता येईल. देशसेवा करणाऱ्या सैनिकांच्या कल्याणासाठी अनेक जण पुढे येऊ शकतात. त्यासाठी महानगरपालिका, पालिका, सेवा केंद्र याठिकाणी ध्वज निधी संकलन कॅशलेस ठेवावे असे आवाहनही जिल्हाधिकारी यांनी यावेळी केले. याप्रसंगी सैनिकांच्या पाल्यांना वेगवेगळ्या क्षेत्रात प्रविण्य मिळाल्याबद्दल बक्षीसाचे धनादेश देऊन जिल्हाधिकारी यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. या प्रसंगी सर्वाधिक निधी संकलन करणाऱ्या कार्यालय प्रमुखांचाही गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी निलेश पाटील यांनी केले. त्यात त्यांनी जिल्हा सौनिक कल्याण विभागामार्फत केलेल्या कामाची सविस्तर माहिती सांगितली.

Protected Content