जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । क्रिडांगणावर होत असलेल्या स्पर्धेचे उद्घाटन करताना मला आनंद होत आहे. खेळाडूने आपल्या खेळात सातत्य व जिद्द ठेवली तर त्याचा फायदा आयुष्यात सुद्धा होतो असे मार्गदर्शन आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांनी केले.
जळगाव महानगरपालिका अंतर्गत सुब्रोतो मुखर्जी आंतरशालेय फुटबॉल स्पर्धेला श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल येथे बुधवारी १३ जुलै रोजी सुरुवात झाली असून या १४ वर्षाखाली मुलांच्या स्पर्धेसाठी ११ संघांनी सहभाग नोंदवला आहे. त्यावेळी त्या बोलत होत्या.
कार्यक्रमाप्रसंगी जिल्हा क्रीडा अधिकारी मिलिंद दीक्षित, जिल्हा फुटबॉल संघटनेचे सचिव फारूक शेख, उपाध्यक्ष जफर शेख, सहसचिव अब्दुल मोहसिन, स्पोर्ट्स हाउसचे आमीर शेख, महिला सुरक्षा समितीच्या निवेदिता ताठे, क्रीडा अधिकारी एम.के. पाटील, क्रीडा संचालक आसिफ खान आदींची उपस्थिती होती.
आयोजित स्पर्धेत बी.यू.एन. रायसोनी इंग्लिश मीडियम, सेंट जोसेफ, सेंट लॉरेन्स, एल एच पाटील, विद्या इंग्लिश स्कूल, पोतदार स्कूल, गोदावरी इंग्लिश स्कूल, ओरियन सीबीएससी, ओरियन स्टेट बोर्ड, रोजलॅण्ड इंग्लिश मीडियम स्कूल या शाळेतील खेळाडूंनी सहभाग नोंदविला. स्पर्धेचे प्रास्ताविक संघटनेचे सचिव फारूक शेख यांनी केले तर आभार एम.के. पाटिल यांनी मानले.