भडगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | राज्य शासनाने 16 मे पासून कपाशी बियाणे विक्रीस परवानगी दिलेली आहे. मात्र शेतकऱ्यांनी एक जून नंतर लागवड करणे बाबत शासनाने सूचना दिलेल्या आहेत. भविष्यातील संभाव्य नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी एक जून नंतरच कपाशीची लागवड करावी असे आवाहन कृषी अधिकारी पंचायत समिती भडगाव यांनी केले आहे. तसेच तण नाशकास संवेदनशील असे एचटीबीटी बियाणे पर्यावरण, मानव व प्राणी मात्रास हानिकारक असल्याने राज्यात असे बियाणे विक्री करण्यास शासनाने परवानगी दिलेली नाही व कायद्याने गुन्हा ठरविण्यात आले आहे, तरी जिल्ह्यात व जिल्ह्याबाहेर अनधिकृत पणे एचटीबीटी बियाणे सापडल्याने त्यांच्यावर पोलीस केस दाखल करण्यात आले आहेत.
भडगाव तालुक्यात देखील अशा प्रकारचे परवानगी नसलेले कपाशी बियाणे लागवडीसाठी छुप्या मार्गाने उपलब्ध होण्याची शक्यता नाकारता येत नाही. परंतु असे बियाणे अनधिकृत व्यक्तीमार्फत कुठल्याही प्रकारचे बिले न देता विक्री होऊ शकते. अशा बियाण्यापासून उत्पादनाची कुठल्याही प्रकारची हमी नसते, तसेच शेतकऱ्यांचे पिकाचे नुकसान झाल्यास तक्रार देखील दाखल होऊ शकत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होऊ शकते, याकरिता शेतकरी बांधवांनी कुठल्याही अनधिकृत व्यक्ती मार्फत अशा प्रकारचे बंदी असलेले कपाशी बियाणे खरेदी करू नये, तसेच अशा प्रकारचे बंदी असलेले बियाणे आपल्या गावात, परिसरात विक्री होत असल्यास कृषी अधिकारी पंचायत समिती भडगाव तसेच तालुका कृषी अधिकारी भडगाव यांना तात्काळ अवगत करण्यात यावे. शेतकऱ्यांनी कुठल्याही प्रकारचे बियाणे हे अधिकृत परवानाधारक विक्रेते यांच्याकडूनच पक्के बिल प्राप्त करूनच खरेदी करण्यात यावे. जेणेकरून आपली फसवणूक होणार नाही.
कपाशी लागवड एक जून नंतर करा; कृषी अधिकारी पंचायत समितीचे आवाहन
9 months ago
No Comments