पीजे रेल्वेला ब्रॉडगेजमध्ये परिवर्तीत करण्याच्या प्रक्रियेला प्रारंभ

p j railway

भुसावळ प्रतिनिधी । पाचोरा ते जामनेर या मार्गावरील नॅरोगेज रेल्वेस ब्रॉडगेजमध्ये परिवर्तीत करण्याच्या प्रक्रियेला प्रारंभ होणार असल्याची माहिती डीआरएम विवेककुमार गुप्ता यांनी दिली.

नुकत्याच जाहीर झालेल्या अतिरिक्त अर्थ संकल्पात मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील विविध कामांसाठी तरतूद करण्यात आली आहे. या संदर्भातील पिंक बुक हे रेल्वे प्रशासनाला नुकतेच प्राप्त झाले असून याचीच माहिती डीआरएम विवेककुमार गुप्ता यांनी दिली. याप्रसंगी त्यांच्यासोबत एडीआरएम मनोज सिन्हा, वरिष्ठ वाणिज्य प्रबंधक राजेंद्र शर्मा, जीवन चौधरी, प्रीतम राणे आदी उपस्थित होते. याप्रसंगी डीआरएम गुप्ता म्हणाले की, गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित पाचोरा-जामनेर नॅरोगेज लाइनचे ब्रॉडगेज रुपांतर मार्गी लागणार आहे. त्यासाठी ८५० कोटी रूपयांचा निधी प्रस्तावित आहे. या मार्गाचे लवकरच सर्व्हेक्षण केले जाणार असून, त्यासाठी संबंधित कंपनी अथवा रेल्वे प्रशासनाकडून पुढील प्रक्रिया पार पाडली जाईल. या मार्गाला ब्रॉडगेजमध्ये परिवर्तीत केल्यामुळे या भागातील प्रवाशांना लाभ होणार आहे. सर्वात महत्वाची बाब म्हणजे हा मार्ग पुढे मलकापूरपर्यंत वाढविला जाणार आहे. याच्या सर्वेक्षणासाठी एक कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली असून रेल्वे बोर्डातर्फे मान्यता मिळाल्यानंतर याच्या प्रत्यक्ष कामास प्रारंभ होणार आहे.

दरम्यान, डीआरएम गुप्ता यांनी अर्थसंकल्पातील अन्य तरतुदींबाबतही माहिती दिली. ते म्हणाले की, जळगाव-भुसावळ तिसरी व चौथी लाईन आणि पादचारी पूल, रेल्वे रूळ बदलणे, सिग्नल यंत्रणेचे अद्ययावतीकरण आदी कामांसाठी रेल्वे मंत्रालयाने ६५० कोटी रूपयांची तरतूद केली आहे. भुसावळ विभागात रेल्वे गेट बंद करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आले असून १०७ पैकी १७ रेल्वेगेट आतापर्यत बंद करण्यात आले आहेत. २०२४ मध्ये रेल्वेचा भुसावळ विभाग रेल्वे गेट मुक्त होणार आहे. विभागातील विविध रेल्वे स्थानकांवर २४ लिफ्ट आणि आठ सरकते जीने मंजूर झाले आहे. त्यामुळे प्रवाशांना जास्तीतजास्त सुविधा मिळणार आहे. तसेच विभागातील ७० रेल्वे स्थानकांवर वायफाय सुविधा दिली जाणार आहे, असे डीआरएम विवेककुमार गुप्ता यांनी सांगितले. भुसावळ विभागातून प्रथमच भुसावळ-नरखेड मार्गावर १६ डब्यांची मेमू गाडी धावणार असून टप्प्याटप्प्याने पॅसेंजर गाड्यांऐवजी मेमू गाड्या सुरू केल्या जाणार आहेत, असेही डीआरएम गुप्ता म्हणाले.

Protected Content