उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्या प्रयत्नांनी पिंप्राळ्यात कोरोना लसीकरण केंद्रास प्रारंभ

जळगाव, प्रतिनिधी । पिंप्राळ्यासह परिसरातील नागरिकांसाठी कोरोनाच्या लसीकरणाची सुविधा उपलब्ध करावी या मागणीसाठी उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आले असून आजपासून येथील शाळेत लसीकरण केंद्रास प्रारंभ करण्यात आला आहे.

याबाबत वृत्त असे की, सध्या जळगाव शहरासह जिल्ह्यात कोरोनाचे लसीकरण सुरू आहे. यात शहरात लसीकरणाची अनेक केंद्र कार्यान्वित करण्यात आली असली तरी अद्यापही पिंप्राळ्यासह परिसरात लसीकरण उपलब्ध नव्हते. यामुळे लस घेण्यासाठी इच्छुक असणार्‍यांना कडाक्याच्या उन्हाळ्यात इतरत्र पायपीट करावी लागत होती. या पार्श्‍वभूमिवर, पिंप्राळा परिसरातील नागरिकांना लसीकरणाची सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी पाठपुरावा केला.

या संदर्भात उपमहापौर पाटील यांनी महापालिका आयुक्त, जिल्हाधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याकडे पाठपुरावा करून पिंप्राळा येथील शाळेत लसीकरण केंद्र मंजूर करून आणले. काल दुपारी जिल्हा प्रशासनाकडे लसींचा साठा उपलब्ध झाल्यानंतर आजपासून हे लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले आहे.

महापौर जयश्री सुनील महाजन आणि उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्या उपस्थितीत आज लसीकरणास प्रारंभ करण्यात आला. याप्रसंगी महापौर म्हणाल्या की, या लसीकरण केंद्रासाठी उपमहापौरांनी पाठपुरावा केला असून यामुळे परिसरातील नागरिकांना लाभ होणार आहे. तर उपमहापौर कुलभूषण पाटील म्हणाले की, आजपासून येथे लसीकरणास प्रारंभ झाला असून १८ ते ४४ आणि ४५ वर्षावरील या दोन्ही गटांसाठी येथे लसी उपलब्ध आहेत. तसेच येथे नोंदणीसाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही प्रकारातील सुविधा उपलब्ध आहेत. नागरिकांनी या लसीकरण केंद्राचा लाभ घेण्याचे आवाहन उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी केले. याप्रसंगी शहर अभियंता भोसले, डॉ. सुषमा पाटील, डॉ उगले मॅडम आदींसह आरोग्य खात्याचे कर्मचारी उपस्थित होते.

लसीकरणासाठी महापालिकेच्या आरोग्य खात्याने अद्ययावत यंत्रणा उभारली आहे. याचा पिंप्राळ्यासह परिसरातील नागरिकांनी लाभ होणार आहे. उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी पाठपुरावा करून लसीकरण केंद्र सुरू केल्याने आबालवृध्दांनी त्यांचे आभार मानले आहेत.

Protected Content