चक्क ग्रामपंचायतीतील दप्तरच झाले गायब…!

पहूर, ता. जामनेर प्रतिनिधी | येथून जवळच असलेल्या पिंपळगाव कमानी ग्रामपंचायतीचे दप्तरच गायब झाल्याचे उघडकीस आले असून या प्रकरणी ग्रामस्थांनी कारवाईची मागणी केली आहे.

याबाबत माहिती अशी की, पहूर येथून जवळच असलेल्या पिंपळगाव कमानी येथील ग्रामपंचायतीचे दप्तर गायब झाल्याचा प्रकार उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. जवळपास सहा महिन्यापासून ग्रामपंचायत मध्ये दप्तर नसल्याचे ग्रामपंचायत सदस्यांनी सांगितले आहे, ग्रामपंचायत मध्ये दप्तर नसल्यामुळे नागरिकांना मुलांच्या शैक्षणिक पात्रतेसाठी रहीवासी दाखले आणि इतर कागदपत्रे वेळेवर मिळत नसल्याने नागरिकांचे हाल होत आहेत.

या संदर्भात जामनेर येथील गटविकास अधिकारी यांना कळविले असता ते सुद्धा दुर्लक्ष करत आहेत. आणि ग्रामसेवक महिन्यातून फक्त एक वेळा गावात येत असूनही सरपंच हे ग्रामसेवकाला काहीही न बोलता मनमानी कारभार कारभार करण्याची मुभा देत असल्याचा आरोप होत आहे. तसेच सरपंच महिला असून संपूर्ण कारभार त्यांचे नातेवाईकच बघत असल्यामुळे गावातील ग्रामपंचायत सदस्यांसह संजय राठोड यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

गावात काहीही विकास होत नसल्याचे सदस्यांनी म्हटले आहे,तसेच ग्रामपंचायतीचे नविन बांधकाम जवळपास दीड वर्षापासून पूर्ण झाले असून ग्रामपंचायत मध्ये असलेले महापुरुषाचे फोटो मात्र एका ठिकाणी जमा करून ठेवले आहेत. तसेच ग्रामपंचायतीसमोर घाणीचे साम्राज्य असल्यामुळे गावातील गटारीचे पाणी ग्रामपंचायत जवळ साचत आहे, गावात कोणत्याही योजना राबविण्यात येत नसून आधारकार्ड जमा करून सरपंच आणि ग्रामसेवक नागरिकांची दिशाभूल करत आहे. याबाबत ग्रामपंचायत सदस्य चेतन चव्हाण, आणि कैलास चव्हाण यांनी गावातील सदस्यासह नारायण चव्हाण, जोतमल चव्हाण, लखीचंद राठोड, देवलाल चव्हाण, एकनाथ चव्हाण, देविदास चव्हाण, कालू चव्हाण, भरत चव्हाण, प्रवीण राठोड यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिकांनी ग्रामपंचायत मध्ये जाऊन दप्तराची पाहणी केली असता त्यांना या ठिकाणी दप्तर नसल्याचे आढळून आले आहे. याची वरिष्ठ अधिकार्‍यांनी दखल घेऊन दोषींवर कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

Protected Content