यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | यावल येथील नगर परिषदेच्या कार्यक्षेत्रातील विस्तारित भागात गेल्या अनेक दिवसांपासून डुकरे मरण्याचे सत्र सुरूच असून आपल्या कुटुंबाच्या आरोग्याची निगडित समस्येला घेऊन पशुसंवर्धन विभाग आणि नगरपरिषद प्रशासन या विषयाला घेऊन उदासीन दिसून येत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
या संदर्भातील वृत्त असे आहे की यावल नगरपरिषदेचे कार्यक्षेत्रात मागील एक ते दोन महिन्यापासून कुठल्यातरी अज्ञात आजाराने डुकरे मोठ्या प्रमाणात मरण पावत आहे. यावल नगरपरिषद प्रशासन मेलेले डुकरे उचलण्याच्या पलीकडे काहीही उपाययोजना करतांना दिसून येत नसल्याने नगर परिषदच्या या भोंगळ व दुर्लक्षित कारभारामुळे यावल शहरवासीयांमध्ये मोठ्या प्रमाणावर नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. यावल शहरातील विस्तारित वसाहती मध्ये गेल्या दोन महिन्यांपासुन अज्ञात आजाराने मोठमोठी डुकरांचा तडफडून मृत्यु झाल्याचे प्रकार सुरू आहे.
नगर परिषद प्रशासन या नागरीकांच्या आरोग्याशी संबधीत गंभीर विषयाकडे लक्ष देत नसल्याची संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करीत आहे. दरम्यान दोन दिवसापुर्वी पशुसंवर्धन विभागाने डुकरे मृत्यु होत असल्याच्या पार्श्वभुमीवर यावल शहराला भेट दिली व थातुरमातुर चौकशीचा देखावा केला व निघुन गेलेत मात्र शहरात होत असलेला शेकडो डुकरांचा मृत्यु हा नेमका कशामुळे होत आहे त्यांना याचे उत्तर मिळु शकले नाही .एकीकडे ज्या परिसरात डुकरांचा मोठया मृत्यु होत आहे. त्याच परिसरात उलटपक्षी मोठया प्रमाणावर डुकरे सोडण्यात येवुन नागरीकांच्या आरोग्याशी नगर परिषद प्रशासन खेळ करीत असल्याची जनभावना निर्माण झाली आहे. नगर परिषद प्रशासनाने किमान डूकरे सोडणाऱ्यांवर तरी योग्य ती कारवाई करून या परिसरात सोडलेली डुकरे उचलावीत अशी मागणी होत आहे .