१६६ कोटीच्या थकीत बिलाच्या वसुलीसाठी महावितरण मैदानात

बुलडाणा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | अकोला परिमंडलाअंतर्गत अकोला,बुलडाणा आणि वाशिम जिल्ह्यातील विविध वर्गवारीतील ग्राहकांकडे थकीत असलेल्या विजबिलाचे १६६ कोटी रूपयाच्या वसुलीसाठी महावितरणने मोहिम अधिक तीव्र केली आहे. वीजबिल भरण्याला प्रतिसाद न देणाऱ्या आठ हजार १०३ वीज ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे.त्यामुळे महावितरणची कटू कारवाई टाळण्यासाठी वीज ग्राहकांनी थकीत असलेली वीजबिलाची संपूर्ण रक्कम भरून सहकार्य करण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.

महावितरण अकोला परिमंडलातील कृषी ग्राहक वगळून उच्चदाब आणि लघुदाब वर्गवारीतील सुमारे १३ लाख ७४ हजार ७९७ ग्राहक आहेत. यामध्ये घरगुती ग्राहक ९ लाख ५२ हजार ५७५ ,वाणिज्यिक ७० हजार ६७१,औद्योगिक २५ हजार ३०९,आणि इतर वर्गवारील १९ हजार ५७५ ग्राहकांचा समावेश असून त्यांना महावितरणकडून वीज पुरवठा करण्यात येतो. परंतू परिमंडलात विविध वर्गवारीतील वीज ग्राहकांकडे २४ फेब्रुवारी २०२४ अखेर १६६ कोटी रूपये वीजबिलाचे थकल्यामुळे महावितरणची आर्थीक अडचण निर्माण झाली आहे.त्यामुळे वसुलीसाठी महावितरणने मोहिम अधिक तीव्र केली आहे. वरीष्ठ अधिकाऱ्यांचा सहभाग असलेल्या या मोहिमेत थकबाकीदार ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करण्यात येत आहे.

थकबाकीनुसार विचार केला तर परिमंडलात विविध वर्गवारीतील १६६ कोटी १६ लाख रूपयाच्या थकबाकीमध्ये १२९ कोटी २८ लाखाची थकबाकी घरगुती ग्राहकांची आहे.वाणिज्यिक ग्राहकांकडे १५ कोटी २ लाख,औद्योगिक ग्राहकाकडे १२ कोटी २२ लाख आणि इतर वर्गवारीतील वीज ग्राहकाकडे ९ कोटी ६३ लाख वीज बिलाचे थकले आहे.

आर्थिक वर्षाच्या शेवटच्या टप्प्यात असतांनाही वसुलीचे असलेले व्यस्त प्रमाण बघता थकबाकीदार ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करण्यात येणार आहे.मोहिम सुरू केल्यापासून आतापर्यंत ८ हजार १०३ ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे.फेब्रुवारीचे तीन दिवसासाठी आणि मार्च महिन्याकरीता प्रत्येक कर्मचाऱ्यांना थकीत वीजबिल वसुलीसोबत वीज पुरवठा खंडित करण्याचे उध्दीष्ठ देण्यात आले आहे.

महावितरणने वीजबिल वसुली मोहिम अधिक तीव्र केली आहे.या मोहिमेत वीजबिल न भरणाऱ्या त्या प्रत्येक ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित होणार आहे.सोबत ग्राहकांना महावितरणची कटू कारवाई टाळता यावी यासाठी महावितरणची अधिकृत वीजबिल भरणा केंद्रे ३१ मार्चपर्यंत सार्वजनिक सुट्टीच्याही दिवशी कार्यालयीन वेळेत सुरू राहणार आहे.याशिवाय ग्राहक महावितरण मोबाईल एप,महावितरण संकेतस्थळ यावरूनही वीजबिल भरू शकतात आणि ऑनलाईन वीजबिल भरल्यामुळे मिळणारी सवलत घेऊ शकतात.

 

Protected Content