बोदवड (प्रतिनिधी) जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे अनेक माजी आमदार भाजपात प्रवेश करणार असल्याच्या चर्चेने जोर धरलेला असतांना आज अचानक मुख्यमंत्र्यांच्या स्वागतपर फलकावर चक्क राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रविंद्रभैय्या पाटील यांचा फोटो असल्यामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे.
यासंदर्भात अधिक असे की, बोदवड शहरामध्ये उद्या (शनिवार) मुख्यमंत्री महाजनादेश यात्रेचे दुपारी आगमन होणार आहे. या पार्श्वभूमीवर बोदवड तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने तसेच भाजपाचे वर्चस्व असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांकडून मुख्यमंत्र्यांचे स्वागतपर फलक शहरात जागोजागी लावलेले आहेत. मुख्यमंत्र्यांचे जल्लोषात स्वागत करण्याची तयारी भारतीय जनता पार्टी करीत आहे. याचं पार्श्वभूमीवर डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक अनिल चौधरी यांच्या व्यावसायिक दुकानावर राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रविंद्रभैय्या पाटील यांचा फोटो मुख्यमंत्र्यांच्या बोदवड कॉ.ऑप. सेल परचेसकडून लावण्यात आलेल्या स्वागत फलकावर स्वागतोउत्सुकांमध्ये लावण्यात करण्यात आलेला आहे. या फलकावर सेलपरचेस चेअरमन रवींद्र कृष्णाजी वराडे यांच्यासोबत सर्व संचालकांचे फोटो छापण्यात आले असून बोदवड शहरासह तालुक्यात रविंद्रभैय्या यांच्या फलकावरील फोटोमुळे वेगवेगळ्या चर्चाना उधाण आले आहे.
या संदर्भात अॅड. रवींद्रभैया पाटील यांच्याशी प्रस्तुत प्रतिनिधीने संपर्क साधला असता, त्यांनी याबद्दल आपल्याला काहीही माहिती नसून हा भाजपचा खोडसाळपणा असू शकतो असे सांगितले. तर सेल परचेसचे रवींद्र वराडे यांना याबाबत विचारले असता त्यांनी या प्रकरणाची चौकशी करून सांगतो असे उत्तर दिले. तर हे बॅनर काढण्यात आले असले तरी याबाबत चर्चेला उधाण आले आहे.