अमळनेर (प्रतिनिधी) बाजार समितीच्या मालकीच्या पातोंडा येथील गेल्या अनेक वर्षांपासून पडीत जागेवर पेट्रोलपंपाला परवानगी मिळाली असल्याने बाजार समितीच्या उत्पन्नात भर पडणार आहे. सभापती उदय वाघ यांनी यासाठी विशेष प्रयत्न केले होते.
अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील जागेत व्यापारी गाळे , गुरांचा बाजार , कांदा बाजार सुरू केले. कार्यालयासाठी बांधलेल्या इमारतीत सभापती यांनी जाणे टाळून जुन्या इमारतीतच कार्यालय सुरू ठेवले. नव्या इमारती जिल्हा बँक व तापी महामंडळाला भाडयाने देऊन बाजार समितीच्या उत्पन्नात वाढ केली आहे. त्यांनतर बाजार समितीच्या मालकीचे उपबाजारसाठी तालुक्यात मारवड, पातोंडा आणि नांदेड येथे जागा आहेत. यापूर्वी त्यांचा वापर होत होता. मात्र, गेल्या अनेक वर्षांपासून त्या जागा पडीत असून त्याचा उपयोग होत नव्हता. म्हणून सभापती उदय वाघ यांनी दूरदृष्टी ठेवून जागेचा सदुपयोग करून घेण्यासाठी व कायमस्वरूपी बाजार समितीच्या उत्पन्नात भर पडावी म्हणून पातोंडा येथील गट न 327 मधील जागेत पेट्रोलपंप सुरू करण्याचा निर्णय घेतला होता.
या निर्णयाला इतर संचालकांनी संमती दिल्याने ऑगस्ट महिन्यात प्रस्ताव इंडियन ऑइल कंपनीला पाठवण्यात आला होता. कंपनीचे उप महाव्यवस्थापक एस.एम.तुमाणे यांनी नुकतेच बाजार समितीला परवानगी पत्र दिले असून दोन महिन्यांच्या आत सर्व कायदेशीर परवानगी प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. पातोंडा हे गाव धुळे,चोपडा या राज्यमहामार्गावर असून अमळनेर व चोपडा दरम्यानचे मोठे गाव आहे. बाजारसमितीची जागा राज्यमहामार्गालगत असल्याने आणि वाहतूक भरपूर असल्याने बाजार समितीच्या उत्पन्नात चांगलीच भर पडणार आहे.