यावल – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील फैजपूर येथे तालुका विधी सेवा, वकील संघ व राज्य विधी सेवा प्राधिकरणाच्या संयुक्त विद्यमाने लोक अदालतीचे व कायदेविषयक शिबिर संपन्न झाले. यात प्रलंबित प्रकरणांचा निपटारा करण्यात आला.
जिल्हा विधी सेवा प्राधिकरण जळगाव यांचे निर्देशानुसार मंगळवार, दि. १४ जून रोजी लोकअदालतीचे व कायदेविषयक शिबिराचे आयोजन फैजपूर पोलीस ठाण्याच्या आवारात यावल येथील न्यायमूर्ती व्ही एस डांमरे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात अन्न सुरक्षा कायदा, बालकांचा शिक्षणाचा अधिकार, एन ए एल एस ए योजनांची माहिती देण्यात आली.
या शिबिरास फैजपुर शहर व परिसरातील नागरीकांनी चांगला प्रतिसाद दिला . यावल तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष न्या. व्ही एस डांमरे व फैजपूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर आखेगावकर , सरकारी वकील फरीद शेख, अॅड.अप्पासाहेब चौधरी, अॅड के डी सोनवणे आदी मान्यवर या कायद्देविषयक शिबीरात सहभागी झाले होते.
या कायदेविषयक शिबिरात अॅड. फरीद शेख यांनी ‘पोक्सो’ कायदा विषयक व अॅड अप्पासाहेब चौधरी यांनी ‘लाचलुचपत प्रतिबंधक’ कायदा विषयी मार्गदर्शनपर माहीती दिली. अॅड. के. डी. पाटील यांनी विधी सेवा प्राधिकरणची माहीती दिली. अॅड. गौरव पाटील, अॅड. सुलताना तडवी आदींनी यावेळी विविध विषयांवर मार्गदर्शन पर माहीती दिली. ११ प्रकरणाचा निपटारा करण्यात येवून २० हजार रूपये महसुली जमा करण्यात आले आहे.